लातूर | प्रतिनिधी
सतत दारू पिऊन शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीचा पत्नीनेच जीव घेतल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पत्नी अर्चना गायकवाड हिला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत पतीचे नाव प्रशांत गायकवाड असे आहे. लग्नानंतर प्रशांत सतत दारू पिऊन पत्नीला मारहाण व त्रास देत असल्याने अर्चना काही वर्षांपूर्वी माहेरी गेली होती. तब्बल पाच वर्षांनंतर ती पुन्हा सासरी परतली; मात्र पतीचा स्वभाव व सवयींमध्ये कोणताही बदल झाला नाही.
काही दिवसांपासून दोघांमध्ये तीव्र कौटुंबिक वाद सुरू होता. याच वादातून रागाच्या भरात अर्चनाने प्रशांतचा गळा आवळून, त्यानंतर भिंतीवर आपटून त्याची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. घटनेनंतर पतीचा मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्नही तिने केला होता.
मात्र पोलिसांनी केलेल्या कसून तपासात हा बनाव उघडकीस आला. अखेर अर्चनाने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादाचे भीषण परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत.