शिक्षण विभागातील मोठी कारवाई!
बीड कार्यकाळातील अनियमिततेवर पडली गंडांतराची कुर्हाड
लातूर,दि. 19(मिलिंद कांबळे)
शिक्षणासारख्या पवित्र समजल्या जाणाऱ्या विभागात प्रशासनिक स्वच्छतेचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, लातूर जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रलंबित असलेल्या अनियमिततेच्या चौकशीमुळे ही कारवाई करण्यात आली असून शिक्षण विभागात याबाबत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील कार्यकाळात महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 च्या नियम 4(1)(अ) अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा अतिवापर व गैरवापर केल्याची गंभीर तक्रार वरिष्ठांकडे दाखल झाली होती. वैयक्तिक मान्यता संबंधित काही महत्वाच्या प्रकरणात नियमबाह्य निर्णय घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु झाली असून, प्राथमिक चौकशीत अनियमितता असल्याचे नमूद झाल्यानंतर शासनाने हा कडक निर्णय घेतला आहे.
लातूर जिल्हा परिषदेत सध्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असलेल्या शिंदे यांचे निलंबन आदेश महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव यांनी जारी केले. निलंबन काळात शिंदे यांनी शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय जिल्हा परिषद मुख्यालय सोडून जाता येणार नाही, असा स्पष्ट आदेशही देण्यात आला असून त्यांच्या हालचालींवर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात अधिकारी स्तरावर अशा प्रकारच्या कारवाया क्वचितच ऐकू येतात. शिक्षण विभाग म्हणजे मूल्यांचे, नियमांचे आणि सचोटीचे प्रतीक मानले जाते, मात्र अधिकारीच नियमाला फाटा देऊन अमिषाला बळी पडताना दिसल्याने या घटनेबाबत विविध स्तरावर चर्चा रंगल्या आहेत. प्रशासनातील स्वच्छता, अधिकारी वर्गाची जबाबदारी आणि शासन यंत्रणेची भुमिका यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
नागनाथ शिंदे यांच्या निलंबनाच्या आदेशाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावरील कारवाई कायम राहणार आहे. पुढील चौकशी अहवालानुसार अधिक मोठी दंडात्मक कारवाई होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रात अशा प्रकरणांनी पुन्हा एकदा नियम मोडणाऱ्यांना शासनाची कठोर भूमिका हा संदेश अधोरेखित केला आहे.
मिलिंद कांबळे, लातूर
मो. 9960049411