धनंजय मुंडेंवर कठोर कारवाईची मागणी
लातूर,दि.10
मराठा आरक्षणाचा लढा राज्यभरात निर्णायक टप्प्यावर असताना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांच्या ‘हत्येची सुपारी दिल्याचा’ गंभीर आरोप सामाजिक माध्यमांवर आणि काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. चौकातील सार्वजनिक शौचालयावर मंत्री धनंजय मुंडे यांचे पोस्टर लावून आणि त्यावर प्रतीकात्मक थुंकी आंदोलन करत आंदोलकांनी रोष व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवावर उठणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीतून मांडली. स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.आंदोलकांनी सांगितले की,मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी आयुष्य पणाला लावले आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत जर किंचितही संशय निर्माण झाला, तर तो संशय दूर करणे सरकारची जबाबदारी आहे. अशा गंभीर आरोपांवर सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे.अनोख्या आंदोलनामुळे परिसरात उत्सुकता आणि चर्चा रंगली. काहींनी ही आंदोलनाची पद्धत आक्रस्ताळी असल्याची टीका केली, तर काहींनी तीव्र रोष व्यक्त करण्याचा हा मार्ग योग्य असल्याचे मत व्यक्त केले.
दरम्यान, स्थानिक पोलिसांनी या आंदोलनाची नोंद घेतली असून कोणतीही अनुचित परिस्थिति निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबत सरकार कोणती पावले उचलते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.