लातूर,दि.12
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ. आंबेडकर पार्क येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि मान्यवर उपस्थित होते.
जयंती सोहळा त्रिसरण व पंचशीलाचे सामूहिक पठण करून सुरू झाला. तत्पूर्वी भैय्यासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा. कल्याण कांबळे उपस्थित होते. म्हणाले,यावेळी कांबळे म्हणाले की, “भैय्यासाहेब आंबेडकर हे फक्त डॉ. बाबासाहेबांचे पुत्र नाहीत, तर समता-आधारित समाजनिर्मितीसाठी अडिग संकल्पाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यामुळे भारतीय बौद्ध समाजाला नवी ऊर्जा व नेतृत्व मिळाले आहे.”
महासभेच्या सरचिटणीस अभिमन्यू लामतुरे यांनी ग्रामीण भागात धम्मजागृती शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र, तरुणांसाठी समता सैनिक शिबिरे व लीडरशिप प्रशिक्षण, तसेच बौद्ध साहित्याचे डिजिटलायझेशन या उपक्रमांची घोषणा केली.
महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा शारदाताई हजारे म्हणाल्या की, संविधान समर्थक महिला मेळावा घेऊन महिलांना हक्क, न्याय आणि अधिकारांची जाणीव करुन दिली जाईल.
दीपप्रज्वलनानंतर उपस्थितांनी “बुद्धं शरणं गच्छामि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भैय्यासाहेब आंबेडकर” असा घोष करून एकात्मतेचा संदेश दिला.
धम्म दीक्षा समितीचे राहुल गायकवाड म्हणाले की, ग्रामीण भागातील समाजात धम्मविषयी जागरूकता, शिक्षण, करुणा आणि समतेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले जाईल.
समारोप सरणतय गाथेने झाला. यावेळी हिराचंद गायकवाड, माजी पदाधिकारी, समाजातील मान्यवर तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा (प.)च्या पदाधिकारी उपस्थित होते.