लातूर, दि.२६
शहरातील राजकारणात आज मोठा भूकंप झाला. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.
महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना झालेला हा प्रवेश काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. लातूर शहरात एकेकाळी अमित देशमुख यांचे निष्ठावान सहकारी म्हणून कार्यरत असलेले गोजमगुंडे यांनी अचानक घेतलेला निर्णय काँग्रेसच्या गोटात राजकीय चर्चांना ऊत देणारा ठरला आहे.
पक्ष प्रवेशानंतर बोलताना गोजम गुंडे यांनी सांगितले की,लातूरच्या विकासासाठी निर्णायक नेतृत्वाची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जे विकासकार्य सुरू आहे त्याचा भाग व्हावे, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले.गोजमगुंडे यांनी अचानक पक्ष सोडल्यामुळे काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये शहरातील मराठा समाज, व्यापारी वर्ग व तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. आगामी निवडणुकीत त्यांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेसच्या गणितात बदल घडवून आणू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
यामुळे लातूरमधील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊन
राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात नवे बळ तर काँग्रेस नेतृत्वाला मोठा धक्का मानला जात आहे.लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील नाराजी, स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि आगामी निवडणुकीची रणनीती याबाबत चर्चा सुरू होती. त्यात गोजमगुंडे यांचा पक्षत्याग हा काँग्रेसला मोठा राजकीय फटका देणारा ठरला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण आता अधिक रंगतदार व ध्रुवीकरणाकडे जाईल, असे संकेत मिळत आहेत.