शिक्षण क्षेत्रासह समाजकार्याची परंपरा जपणाऱ्या कुटुंबावर शोककळा..
निलंगा, दि. २७
निलंगा तालुक्यातील शेळगी येथील प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, माजी सैनिक माधवराव झटिंगराव बोयणे यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने बोयणे घराण्यात तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
स्व. माधवराव बोयणे यांनी दीर्घकाळ देशसेवा केली होती. सैन्य जीवनातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौम्यता, मनमिळाऊ स्वभाव आणि समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आदरभाव दिसून येत असे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना झाला.
त्यांच्या शिक्षणप्रेमी कुटुंबाने समाजात वेगळा ठसा उमटवला आहे.
ते केंद्रीय प्राथमिक शाळा औराद (श) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा. बालाजी बोयणे, दापका (भ) येथील मुख्याध्यापक तानाजी बोयणे, तसेच सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळा औराद (श) येथील मुख्याध्यापक शिवाजी बोयणे यांचे वडील होत. शिक्षण क्षेत्रातील ही तिन्हीही मंडळी तालुक्यात नावाजलेली आहेत.
त्याशिवाय चिंचोली (भं) येथील सहशिक्षिका सौ. सुनिता नाटकरे यांचे ते सासरे होत.
स्व. बोयणे यांनी सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेतला. गावातील विविध उपक्रमांना ते मार्गदर्शन करीत असत. त्यांच्या निधनाने गावातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.अंत्यविधी दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता, त्यांच्या मूळ गावी शेळगी, ता. निलंगा येथे होणार आहे. नातेवाईक, ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बोयणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून श्रद्धांजली संदेशांचा ओघ सुरु आहे..