लातूर,दि.२९
देशाचा आर्थिक कणा असलेल्या मजूर वर्गाला आजही विधिमंडळात स्वतंत्र प्रतिनिधित्व नाही. शासनाच्या योजना, हक्क-अधिकार आणि समस्यांची मांडणी करण्यासाठी मजूरांना स्वतःचा आवाज मिळावा यासाठी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर स्वतंत्र ‘मजूर मतदार संघ’ निर्माण करावा, अशी तीव्र आणि कडक मागणी राष्ट्रीय विकास संघाने केली आहे.
या मागणीसाठीचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असून या निवेदनाची प्रत थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल व मुख्य सचिव यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यामुळे या विषयावर शासनाच्या उच्चस्तरावर लक्ष वेधले गेले आहे.
“शिक्षक आणि पदवीधरांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आहेत, मग देश चालवणाऱ्या सर्वात मोठ्या मजूर वर्गासाठी का नाही?”
अनेक योजना कागदावर असूनही प्रत्यक्ष मजूरांना लाभ मिळत नाही, संरक्षणात्मक कायद्यांची अंमलबजावणी ढिसाळ आहे, स्थलांतरित व बांधकाम मजुरांची स्थिती चिंताजनक आहे, असे संघाचे म्हणणे आहे.
“कष्टकरी माणसाचा घाम राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे; पण शासनव्यवस्थेत त्याला जागा नाही हा लोकशाहीवरील सर्वात मोठा अन्याय आहे,” असा कडक आरोप संघाने केला.
या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष बी. एम. कांबळे, प्रदेश सचिव पंडित गायकवाड, जिल्हा संघटक दिलीप कांबळे यांच्या स्वाक्षऱ्या असून, मजूर हक्कांच्या राष्ट्रीय लढ्यात ही मागणी पहिला निर्णायक टप्पा ठरेल, असा संघाने इशारा दिला.
मिलिंद कांबळे,निलंगा
मो.९९६००४९४११