
लातूर,दि.04
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पूरग्रस्त गावात जलजन्य, किटकजन्य व साथीच्या विविध आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दि.०१ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यातील एकूण १०३ पूरग्रस्त गावात आरोग्य पथकांची नेमणूक करून साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.त्या अनुषंगाने दि. ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी निलंगा तालुक्यातील माने जवळगा व सावरी या पूरग्रस्त गावास प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य विभागामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. या वेळी सदर गावात नियुक्त केलेल्या आरोग्य पथकाकडून त्यांनी पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण, पाणी नमुने तपासणी, साथरोग सर्वेक्षण, उपलब्ध औषधीसाठा, डासांची पैदास होऊ नये म्हणून अबेटींग, धूर फवारणी, आरोग्य शिक्षण व जनजागृती बाबत माहिती घेऊन सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संबधीतांना सूचना दिल्या. यावेळी गावातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी पूरपरिस्थितीनंतर साथीच्या आजारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले. या भेटी दरम्यान त्यांनी उपकेंद्र सावरी व प्राथमिक आरोग्य केंद्र हालगरा येथे भेट देऊन या दवाखान्याव्दारे देण्यात येणाऱ्या सोई सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या.
या वेळी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बरुरे, गटविकास अधिकारी श्री पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिपकुमार जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पोतदार व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.