लातूर,दि.२६
मुरुड ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात, सन्मानात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला विधिवत सुरुवात करण्यात आली.
संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संरचना हे भारताचे अभेद्य सामर्थ्य असून त्यांच्या विचारांचा मजबूत प्रभाव आजही लोकशाहीला दिशा देत आहे, असा ठाम संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
नागरिक म्हणून संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्यांचे पालन, कायद्याचा आदर, समानतेचा विचार आणि बंधुतेचा मार्ग—ही मूल्ये आचरणात आणली तरच संविधानाचा खरा अर्थ सिद्ध होतो, असे मतही व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी लोकशाही व सामाजिक न्याय जपण्याचा सामूहिक संकल्प व्यक्त केला.
सुत्रसंचालनादरम्यान ग्रामपंचायतीत सुरू असलेल्या विविध लोकहिताच्या उपक्रमांची माहितीही देण्यात आली.
कार्यक्रमाला सरपंच अमृता अमर नाडे, उपसरपंच वैभव सापसोड, माजी उपसरपंच हनुमंत नागटिळक, अर्जुन टिळक, सदस्य लता भोसले, सुरज सूर्यवंशी, बालाजी सवाई, रवींद्र नाडे, विशाल कणसे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी-शिक्षक, ग्रामकर्मचारी आणि गावकरी उपस्थित होते.