नागरिकांसाठी डोकेदुखी
निलंगा, दि. 28
निलंगा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे. परंतु या प्रचार मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या घोंगट, बॅनर्स, प्लॅकार्ड ,आणि प्रचार वाहनांमुळे शहरातील सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत शहरातील रस्त्यांवर घोंगट,वाहनावरील घोषवाक्य आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात केलेले प्रचारकार्य नागरिकांचे दैनंदिन जीवन प्रभावित करत आहे. वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी, लहान मुलांचे पालक आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील लोक यांना या ध्वनीमुळे विशेष त्रास होत आहे.
रस्त्यांवर जाम आणि वाहतूक अडथळे
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, मोटरसायकल आणि इतर वाहनांच्या रॅलीमुळे शहरातील मुख्य रस्ते जाम झाले आहेत. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण झाला असून, मुलांना शाळेत सोडणे, बाजारपेठेत खरेदी करणे, औषध घेणे अशा साध्या कामांमध्येही अडचणी येत आहेत. काही नागरिकांनी तर अपघात होण्याची भीती व्यक्त केली आहे.
नागरिक म्हणतात, “राजकारण समजून घेतो, पण निवडणुकीचा प्रचार आमच्या दैनंदिन जीवनात अडथळा आणतो आहे. जर नियम पाळले नसतील, तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.”
स्थानिक व्यापारीही तक्रार करत आहेत की, प्रचार रस्त्यांवर वाहतूक अडथळा निर्माण करतो, ग्राहक येत नाहीत, आणि दुकानांमध्ये व्यवसायावर परिणाम होतो आहे.
विशेषत: वयोवृद्ध नागरिक, रुग्ण, आणि मुलांसह कुटुंब यांच्यावर ध्वनीचा थेट परिणाम होत आहे. त्यांना झोपेचा त्रास, मानसिक ताण आणि रस्त्यावर चालताना सुरक्षिततेचा धोका निर्माण होतो आहे. शिक्षक आणि विद्यार्थी म्हणतात की, शाळेत जाणाऱ्या मुलांवर ही परिस्थिती विपरीत परिणाम करत आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार करणे आवश्यक असले तरी, नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा न निर्माण होता, सुरक्षित आणि शांत पद्धतीने प्रचार केला जावा ही नागरिकांची अपेक्षा आहे.
नागरिकांच्या मागणीनुसार, प्रशासनाने कठोर पावले उचलली तरच निवडणुकीच्या प्रचार मोहिमेचा जनजीवनावर होणारा नकारात्मक परिणाम टाळता येईल.