नियोजित बस औरादला वळवली;प्रवाशांत तीव्र संताप
रास्ता रोकोचा इशारा, एमएसआरटीसी प्रशासनावर प्रश्नचिन्ह..
निलंगा,दि.०६
निलंगा–बसपूर मार्गावरील एमएसआरटीसीची बेफिकीर व मनमानी प्रवासी सेवेला मारक ठरत असल्याचा ताजा प्रकार दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी उघड झाला. सकाळी १०:३० वाजता निलंगा ते बसपूर या निश्चित वेळेची बस अचानक बसपूर ऐवजी औराद मार्गावर वळवण्यात आली. ही बस केळगाव–बसपूर या नियोजित मार्गावर जाण्याऐवजी चालक, वाहक आणि वाहतूक नियंत्रक यांच्या मनमानीनं वळवली गेली, अशी गंभीर तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार निलंगा–औराद या मार्गावर आधीच पुरेशा बस उपलब्ध आहेत. दर 15 ते 20 मिनिटाला 4 ते 5 बस या मार्गावर सुटतात. तरीदेखील बसपूरची ठरलेली बस औरादकडे वळवण्यामागे स्वार्थ, लिप्सुट कारभार किंवा काही अधिकाऱ्यांची टोळीकरणाची भूमिका असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला.
या प्रकारामुळे खडक उमरगा व आसपासच्या गावातील शेकडो प्रवाशांना निलंगा येथे यायला बस मिळाली नाही. विद्यार्थ्यांचे वर्ग बुडाले, रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी जाता आले नाही,शेतकरी व कामगारांचे महत्त्वाचे काम अडकले,महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला लोकवर्ग सेवेत असं निष्काळजीपणं अमान्य असल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.
यावर प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नसून संपूर्ण डेपो व्यवस्थापनच प्रश्नांकित झाले आहे.
या मनमानीविरोधात ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे —
“दररोजची वेळ पाळून बसपूर बस सोडली नाही, तर आम्ही रास्ता रोको करू याची सर्व जबाबदारी एमएसआरटीसी व्यवस्थापनाची असेल.
दिलेल्या तक्रारीवर नारायण सुभाष चव्हाण, माधव श्रीमंत,क्षिरसागर मोहन श्रीपती चव्हाण, वसंत कुमठे, रामराव निवृत्ती भुरे यांच्यासह अनेकांनी स्वाक्षरी करून या त्रासाविरोधात आवाज बुलंद केला आहे.
निलंगा–बसपूर मार्गावरील प्रवासी सेवा स्थिर आणि निश्चित करावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..