निलंगा,दि.०२
निलंगा शहरात आज काँग्रेसने दिलेल्या ‘निलंगा बंद’च्या आवाहनाला संमिश्र परंतु लक्षवेधी प्रतिसाद मिळाला. सकाळी काही भागांत बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू होती, तर मुख्य चौक, महत्त्वाच्या रस्त्यांवर बंदचा स्पष्ट प्रभाव जाणवत होता. व्यापाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आले काहींनी बंदला साथ देत शटर खाली ठेवले, तर काहींनी व्यवसाय सुरू ठेवत आपली नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसने निवडणूक स्थगितीचा निषेध, प्रशासनाची ढिसाळ कार्यपद्धती आणि स्थानिक प्रलंबित मुद्द्यांवर दबाव वाढवण्यासाठी हा बंद पुकारला होता. सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी रॅली काढत मुख्य चौकात विरोध प्रदर्शनानंतर काही वेळ वाहतूक मंदावली. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवली होती.
सामान्य नागरिकांमध्येही बंदाबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिसल्या. काहीजणांनी काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा देत बंद योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी दैनंदिन व्यवहाराबाधित झाल्याने नाराजी व्यक्त केली. शाळा, महाविद्यालये, दवाखाने नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. एकूणच, बंद संमिश्र प्रतिसादावर थांबला असला तरी काँग्रेसने आपला राजकीय संदेश ठळकपणे नोंदवण्यात यश मिळवले.
याबंद मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख,अंबादास जाधव,अजित माने, माजी नगराध्यक्ष विजयकुमार पाटील,
शहर अध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.