लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या प्रकारांचा निषेध..
निलंगा,दि.२७
निलंगा नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेस पक्षाने लोकशाही परंपरेला साजेसा पवित्रा घेत जनतेचा कौल खुल्या दिलाने आणि मोठ्या मनाने स्वीकारला. निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा सामूहिक सत्कार करत काँग्रेसने आपली राजकीय परिपक्वता दाखवून दिली. मात्र, याच वेळी भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी वापरलेल्या अनैतिक, बेकायदेशीर आणि लोकशाहीविरोधी मार्गांवर काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत प्रहार केला.
पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस पक्षाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी स्पष्ट केले की, “मतदानाच्या दिवशी दुपारी चार वाजल्यापासून आम्ही जनतेसमोर आहोत. निकाल लागल्यानंतरही आम्ही कुठेही लपलो नाही. सत्ता असो वा नसो, लोकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. ज्यांनी मतदान केलं त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचेही दुबार आभार कारण लोकशाही मजबूत करणे ही आमची जबाबदारी आहे.” निवडणूक पुढे ढकलण्यामागे संशयास्पद हेतू होता..
काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“जर नियोजित वेळेनुसार २ तारखेलाच निवडणूक झाली असती, तर आज निलंगा नगरपालिकेचा निकाल पूर्णपणे वेगळा असता. कोणताही ठोस कारण नसताना निवडणूक पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या संधीचा गैरफायदा घेतला,” असा गंभीर आरोप करण्यात आला.
पैशांची उधळण, बाहेरगावचे मतदार, दहशतीचे वातावरण
नेत्यांनी सांगितले की, निवडणूक लांबल्यानंतर अमाप प्रमाणात पैशांची उधळण झाली.
ग्रामीण भागातील तसेच बाहेरगावचे १४०० ते १६०० मतदार निलंगा शहरात आणून मतदान करवून घेण्यात आले. काही ठिकाणी मतदारांवर दबाव, धमक्या, आर्थिक प्रलोभने देण्यात आली. शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करून मतदारांना मानसिक गुलाम बनवण्याचा प्रयत्न झाला.
“आम्ही अनेक निवडणुका लढवल्या आहेत नगरपालिका, विधानसभा, लोकसभा पण निलंग्यात यावेळी ज्या पद्धतीने दादागिरी, दबाव आणि पैसा वापरण्यात आला, तसा प्रकार याआधी कधीही पाहिला नव्हता,” असे काँग्रेस नेत्यांनी ठणकावून सांगितले.
आचारसंहिता केवळ कागदावरच?
“आचारसंहिता कुठेच दिसली नाही,” असा थेट आरोप करत काँग्रेसने सांगितले की,
आधारकार्ड व मतदार ओळखपत्र गोळा करून मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्याचे प्रकार घडले. जातीवाद आणि धार्मिक ध्रुवीकरण करून मतदारांना चुकीच्या दिशेने नेण्यात आले.
“अशा निवडणुका लोकशाहीसाठी घातक आहेत,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
‘हा विजय निसटता आहे’ काँग्रेस उमेदवाराला जवळपास ७,८९७ मते (सुमारे ८,०००) मिळाल्याचे नमूद करत, भाजपच्या विजयी उमेदवाराला केवळ १०,००० मते मिळाल्याचे सांगण्यात आले.
“हा विजय गोळी कानावरून गेल्यासारखा आहे. लोकांचा कौल पूर्णपणे भाजपच्या बाजूने नाही,” असे सांगत हा निकाल जनतेच्या दबावातून मिळालेला असल्याची टीका करण्यात आली.
विचारधारांची लढाई स्पष्ट – अभय साळुंके
काँग्रेस नेते अभय साळुंके यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“निलंग्यात आज खरी राजकीय लढाई सुरू झाली आहे. एकीकडे भाजप-आरएसएसची प्रतिगामी, दडपशाहीची विचारधारा आहे; तर दुसरीकडे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, बसवेश्वर यांची पुरोगामी, संविधाननिष्ठ विचारधारा आहे.”
“नगरपालिका ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. येणाऱ्या पाच वर्षांत काँग्रेस एक सक्षम, आक्रमक आणि लोकाभिमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल. निवडून आलेल्या आठ नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक निर्णयावर अंकुश ठेवला जाईल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांचे विशेष आभार
या संघर्षात सत्य लोकांसमोर आणण्यासाठी योगदान दिल्याबद्दल पत्रकार बांधवांचे विशेष आभार मानण्यात आले.
“अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही पत्रकारांनी आमची बाजू निर्भयपणे मांडली. हे उपकार कधीही फेडता येणार नाहीत,” असे भावनिक शब्दांत सांगण्यात आले.
पुढील लढ्याचा निर्धार
काँग्रेस पक्षाने स्पष्ट केले की,
मतदार यादीतील त्रुटी, बेकायदेशीर कृती, पक्षविरोधी कारवाया यापुढे खपवून घेतल्या जाणार नाहीत. कायद्याच्या चौकटीत राहून, संविधानाच्या रक्षणासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांचा यथोचित सत्कार करण्यात आला..