सक्षम, संविधानप्रेमी नेतृत्वाची निवड करा –
प्रा. रोहित बनसोडे
लातूर,दि.२४
निलंगा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना, शहरातील सुजाण मतदारांनी विचारपूर्वक मतदान करून सक्षम नेतृत्व निवडावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक रोहित दिगंबर बनसोडे यांनी केले. ते निलंगा येथे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी आगामी निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले.
गेल्या निवडणुकांमध्ये निलंग्यात एकूण १९ नगरसेवक होते. यंवेळी शहराच्या लोकसंख्येच्या वाढीमुळे ४ नवीन प्रभागांची भर पडली असून, एकूण २३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. याबरोबरच या वेळी नगराध्यक्ष पदासाठी थेट जनतेतून निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरत आहे.
प्रा. बनसोडे म्हणाले की,
“लोकशाहीमध्ये मतदान ही फक्त प्रक्रिया नसून जनतेच्या भविष्याचा निर्णय असतो. निलंगा शहराचा एक सजग, सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने मत देताना जबाबदारीने विचार करणे गरजेचे आहे. निष्ठा, पक्ष, जात किंवा भावनेच्या आधारे नव्हे तर उमेदवाराच्या गुणांवर निर्णय घेतला पाहिजे.”
ते पुढे म्हणाले,
“माणूस कधीकधी चुकीच्या वाटेवर जातो आणि नंतर पश्चाताप करावा लागतो. पण मतदानासारख्या गंभीर निर्णयात चुका टाळण्यासाठी आधीच योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. निकालानंतर पश्चाताप करण्यापेक्षा मतदानापूर्वी विचार करा.”
असेही ते यावेळी म्हणाले
निलंग्यात नगराध्यक्ष पदासाठी काही नावे लोकांमध्ये चर्चेत आहेत.
यांच्यासह इतर काही इच्छुकही मैदानात आहेत.
प्रा. बनसोडे यांनी कोणत्याही उमेदवाराचे नाव पुढे न करता फक्त एवढे सांगितले की, “प्रतिनिधी निवडताना तो प्रामाणिक, संविधान मानणारा व शहराच्या विकासाला प्रामाणिकपणे न्याय देणारा असला पाहिजे.”
शहरातील अनेक छोटी-मोठी कामे गेल्या चार वर्षांत प्रतिनिधीच्या अभावामुळे प्रलंबित राहिली आहेत त्यात प्रामुख्याने रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, मूलभूत सुविधा, विविध लघुउद्योगांचे प्रश्न, नागरिकांच्या दैनंदिन अडचणी याकडे लक्ष देणारा सक्षम नेतृत्वाचा मोठा अभाव जाणवला असल्याचे प्रा. बनसोडे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,
“लोकशाही प्रतिनिधीशिवाय पूर्ण होत नाही. प्रतिनिधी हा जनतेचा आवाज असतो. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत योग्य तो प्रतिनिधी न निवडल्यास पुन्हा पाच वर्षे जनतेलाच त्रास सहन करावा लागेल.”
यावेळी त्यांनी विचारपूर्वक मतदान करण्याचे आवाहन केले.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
“निलंग्याच्या हितासाठी सक्षम, शीलवान, गुणवान व संविधानिक मूल्यांवर चालणारा नगराध्यक्ष निवडा.”
शेवटी त्यांनी सर्व मतदारांना आवाहन करताना म्हटले,
“आपलं मतदान निलंग्याच्या पुढील पाच वर्षांचा पाया मजबूत करणार आहे. म्हणून प्रत्येकाने जबाबदारीची जाणीव ठेवून विचारपूर्वक निर्णय घ्यावा.”असेही ते यावेळी म्हणाले..