अशोकरावांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष…
निलंगा, दि. 17
निलंगा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. भाजपाकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शक्ती प्रदर्शन व मोटारसायकल रॅली काढत अर्ज दाखल करण्यात आले.
तर काँग्रेस पक्षात लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, निरीक्षक विजय देशमुख व जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
तहसील कार्यालयात काँग्रेस, भाजप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी रा. काँ. शरद पवार गट, अजित पवार गट आदी सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे परिसर राजकीय रंगात न्हाऊन निघाला.
उमेदवारांची धावपळ, समर्थकांची घोषणाबाजी आणि पक्षनेत्यांची तातडीची बैठक यामुळे वातावरण तापले होते.
गठबंधनांची अधिकृत घोषणा अद्याप गुलदस्त्यात असून महायुती व महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत चर्चेला उधाण आले आहे.
अर्ज छाननीनंतर मंगळवार, दि. 18 रोजीच अधिकृत उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
एबी फॉर्मवरून तणाव – निलंगेकर विरुद्ध देशमुख गटात चुरस तीव्र..
अधिकृत एबी फॉर्म वाटपावरून भाजप व काँग्रेसमध्येही गटांतर्गत तणाव पाहायला मिळाला. निलंगेकर व देशमुख गटातील कार्यकर्त्यांमध्ये तहसिल कार्यालयात शब्दयुद्ध झाल्याची माहिती समोर आली. कोणत्या इच्छुकाला संधी मिळणार, कोण डावलले जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली.
काँग्रेसमध्ये खासदार काळगे व निरीक्षक देशमुख यांच्या उपस्थितीत अशोक बंगला येथे तब्बल दोन तास बैठक झाली. मात्र एकमत न झाल्याने माजी आमदार अशोकराव पाटील निलंगेकर हे अर्ज दाखल करताना अनुपस्थित राहिले, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये पसरली. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेड्डू ठोकत कार्यकर्त्यांची नाराजी; निरीक्षकांची माघार
काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत नाव नसल्याची चिनगारी लागताच निलंगेकर गटातील काही कार्यकर्त्यांनी तर दिल्लीतून आलेल्या निरीक्षकासमोरच नाराजी व्यक्त करत शेड्डू ठोकल्याची माहिती मिळाली. परिस्थिती गंभीर होताच निरीक्षक देशमुख यांना बैठक सोडून तत्काळ निघावे लागल्याचे दिसून आले.
दरम्यान अशोक बंगल्यावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली होती. काँग्रेसच्या अधिकृत यादीतील नावांच्या चर्चेमुळे निलंगा शहरातील राजकारण आणखी तापले आहे.
तिसरी आघाडी? – लिंबन महाराजांच्या उमेदवारीनं हलचल
शिवसेना (उबाठा) गटाकडून लिंबन महाराज रेशमे यांनी अर्ज दाखल केल्यानं आघाडी गणितात नवीन पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची बिघाडी होणार?
की अशोकराव निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी उभी राहणार?
याकडे निलंगा वाशीयांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.