निलंगा, दि. 10 (वा)
निलंगा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र, पहिल्याच दिवशी कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने निवडणूक प्रक्रियेची सुरुवात शांत वातावरणात झाली.
नगराध्यक्ष तसेच नगरसेवक या दोन्ही पदांसाठी आज अखेरपर्यंत एकही अर्ज प्राप्त झालेला नाही, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. प्रशासनाकडून सर्व निवडणूक तयारी पूर्ण असून, अर्ज स्वीकारण्यासाठी कर्मचारी सज्ज होते; मात्र दिवसभरात उमेदवारांनी अर्ज दाखल प्रक्रिया टाळली.
राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीबाबत अद्याप चर्चा सुरू असल्याने प्रारंभीची शांतता दिसून आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या काही दिवसांत नामनिर्देशन प्रक्रियेला गती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीकडे नागरिक, मतदार आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याची उत्सुकता वाढली आहे.