न्याय न मिळाल्यास 15 जानेवारीला उपविभागीय कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा
निलंगा,दि.05
निलंगा तालुक्यातील मौजे कोकळगाव येथील गरीब, कष्टकरी शेतमजूर महिलांच्या घामावर डल्ला मारत मजुरी बुडवणाऱ्या शेतमालकांनी माणुसकीची सर्व मर्यादा ओलांडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
मौजे सरवडी ता. निलंगा येथील मुजोर शेतमालक परसुकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांनी दिवाळीपूर्वी मजूर महिलांकडून शेतात राबराबून काम करून घेतले, मात्र आजतागायत त्यांच्या कष्टाचे पैसे दिलेले नाहीत.
मजुरी मागितली असता, “तुम्हाला जिथे जायचे तिथे जा, मी एकही फुटका दमडी देणार नाही. माझ्या मोठ्या ओळखी आहेत, माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकीवजा, अहंकारी भाषा वापरून महिलांचा मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे. पोटासाठी राबणाऱ्या माय-माऊलींना अशा प्रकारे डावलले जाणे ही सरळ सरळ शोषणाची उघड घटना आहे. न्यायासाठी पीडित महिलांनी दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी पोलीस ठाणे कासार सिरसी येथे लेखी तक्रार दाखल केली. संबंधित बिट अमलदारांकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र, तब्बल तीन आठवडे उलटूनही पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत बसल्याचा आरोप होत आहे. यामुळे “पोलीस स्टेशन नेमक्या कुणासाठी आहेत ?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
राज्यात नारीशक्ती, महिला सक्षमीकरणाच्या जाहिर घोषणा सुरू असताना, प्रत्यक्षात ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना न्यायासाठी दरवाजे ठोठावावे लागत असतील, तर ही केवळ शेतमालकांची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेची अपयशाची कबुली असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून मजूर महिलांची थकित मजुरी वसूल करून देण्यात यावी. अन्यथा दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, निलंगा येथे छावा-स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आ. भा. छावा संघटना निलंगा तालुका अध्यक्ष दास भैया साळुंके यांनी दिला आहे.