निलंगा, दि. २६
निलंगा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात निलंगा वकील मंडळाच्या वतीने ७५ वा संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. वकील मंडळाचे अध्यक्ष अँड. प्रवीण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात न्यायालयातील ग्रंथालय-लायब्ररी हॉलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. अध्यक्ष अँड. प्रवीण भोसले यांच्या हस्ते प्रतिमापूजनानंतर उपस्थित सर्व विधीज्ञांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानाबद्दलची निष्ठा व्यक्त केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधानाचे ऐतिहासिक महत्त्व, त्यातील मूल्ये व आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता यावर मार्गदर्शन केले. “भारतीय संविधान म्हणजे देशाचा आत्मा असून प्रत्येक नागरिकाने त्यातील मूल्यांचे पालन करणे हीच खरी देशसेवा आहे,” असे मत व्यक्त करत संविधान जपण्याचे आवाहन अध्यक्ष अँड. भोसले यांनी केले.
कार्यक्रमात न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ अँड. एम. आर. जगताप, अँड. अमीर शेख, अँड. विनोद शिरसागर, अँड. सगरे साहेब, अँड. आलमले, अँड. संतोष पवार, अँड. अवधूत नाईक, अँड. अमर हत्ते, अँड. बिराजदार, अँड. विक्रांत सूर्यवंशी, अँड. अनिकेत नाईक, ग्रंथपाल अँड. अमोल ढेरे तसेच सेवानिवृत्त दुय्यम निबंधक रजनीकांत आबा कांबळे, चंदू पात्रे यांच्यासह अनेक वकील व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थितांनी संविधान निर्मितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, न्यायव्यवस्थेतील बदल, नागरिकांचे कर्तव्य आणि आजच्या काळातील संविधानाचे संरक्षण यावर आपापले विचार व्यक्त केले. संविधान दिन हा फक्त औपचारिक कार्यक्रम नसून संविधानातील तत्त्वे प्रत्यक्ष आचरणात आणण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. वकील मंडळाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधत सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.