भाजप–काँग्रेस आमनेसामने, वंचित बहुजन आघाडीचा थर्डफ्रंट ?
निलंगा (प्रतिनिधी)
निलंगा नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकूण 23 सदस्यीय नगरपरिषद आणि 11 प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागातून 2 सदस्य, तर 11व्या प्रभागातून 3 सदस्य निवडले जाणार आहेत.
यंदा नगराध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने राजकीय चुरस अधिकच तीव्र झाली आहे. स्थानिक राजकारणात प्रभाव असलेले अनेक दिग्गज या पदासाठी चर्चेत आहेत.
भाजप–काँग्रेसची थेट लढत
या निवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
राज्यात सत्ताधारी महायुती — म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) — हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत.
तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी निलंग्यातही एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे.
वंचित बहुजन आघाडीचा स्वतंत्र लढणार..?
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी ही ही स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात असून, या थर्डफ्रंटमुळे लढत आणखी चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक स्तरावर वंचित आघाडीने गेल्या काही वर्षांत जनाधार वाढवला आहे, त्यामुळे काही प्रभागांमध्ये या पक्षाचा किंगमेकर रोल राहू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची चर्चा
खुल्या प्रवर्गामुळे अनेक अनुभवी राजकारणी, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते या पदासाठी रांगेत आहेत.
दोन्ही आघाड्यांकडून प्रमुख नेत्यांची नावं गुप्त ठेवण्यात येत असली तरी “निलंग्यातील नगराध्यक्षपदावर कोण कब्जा करणार?” हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही निवडणूक केवळ स्थानिक सत्तेसाठी नव्हे, तर आगामी विधानसभा निवडणुकीचा दिशादर्शक निकाल ठरू शकते.