निलंगा,दि.१३
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती तथा संविधानिक मूल्यांचे कट्टर पुरस्कर्ते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकीय, सामाजिक आणि लोकशाही व्यवस्थेवर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर निलंगा येथे तालुका काँग्रेस कमिटी व नगर परिषद निवडणूक 2025 मधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली कार्यक्रमास तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, नगर परिषद निवडणूक 2025 मधील सर्व उमेदवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम आदरणीय शिवराज पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळत त्यांना आदरांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, शिवराज पाटील हे केवळ काँग्रेस पक्षाचे नेते नव्हते, तर ते भारतीय लोकशाहीचे अभ्यासू, संयमी आणि उच्च नैतिक मूल्यांचे प्रतीक होते. देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली. राजकारणात असूनही त्यांनी कधीही तडजोडीचे राजकारण न करता मूल्याधिष्ठित राजकारणाचा आदर्श निर्माण केला.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले. साधी राहणी, प्रगल्भ विचार, सुसंस्कृत भाषा आणि अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची ओळख होती. त्यामुळेच सर्व पक्षीय नेत्यांकडूनही त्यांना आदराचे स्थान मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व उमेदवारांनी शिवराज पाटील यांच्या विचारांवर व कार्यावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षानेच नव्हे तर संपूर्ण देशाने एक निस्वार्थी, चारित्र्यसंपन्न व लोकशाही मूल्यांचा पहारेकरी गमावल्याची भावना व्यक्त करण्यात आली.