निलंगा,दि.29
निलंगा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असलेल्या एकुण ११ जणांची पक्षशिस्तेचे पालन न केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड गणेश पाटील यांनी दिल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी सांगितले.
निलंगा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने गटतट न पाहता गुणवत्तेवर तिकीट वाटप करून स्वच्छ चारित्र्याचे, जनतेच्या सतत संपर्कात राहणारे एकूण २३ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला असून नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमताने आपले पॅनल शंभर टक्के निवडून येणार आहे. परंतु काँग्रेसच्या काहींनी भाजप आमदाराशी हातमिळवणी करून भाजपला मदत व काँग्रेसला अडचण व्हावी म्हणून नगराध्यक्ष आणि दहा नगरसेवक पदासाठी बंडखोर अपक्ष उमेदवार उभे केले.
उभे करणाऱ्यां संदर्भात निवडणुकीनंतर आम्ही सविस्तर अहवाल देऊ, मात्र उघड बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना कळवले होते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन देशमुख यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठवला असता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी बंडखोर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महमदखा पठाण, नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मीबाई वांजरवाडे, बालाजी कांबळे, साजिद करीम शेख, लक्ष्मी अमोल सोनकांबळे, दिपक चोपणे, पवन पोतदार, रंजना इंहजीत कांबळे, शाबाद युसुफजानी काद्री आणि यशोदा विश्वनाथ कांबळे यांची हकालपट्टी केल्याचे पत्र प्रसिद्ध केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी दिली. काँग्रेस पक्षाने घेतलेल्या भूमिकेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.