निलंगा,दि. २०
निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत आज संपूर्ण शहर राजकीय रणभूमीत रूपांतरित झाले. सत्तेसाठी सुरू असलेल्या अटीतटीच्या लढतीत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले होते.
ही निवडणूक केवळ पक्षांमध्येच नव्हे तर आपल्याच पक्षातील उमेदवारांना मतदान करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांमध्येही तीव्र रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत ११ प्रभागांतून २३ नगरसेवक आणि २४ वा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे. त्यामुळे ही लढत केवळ नगरपालिकेपुरती मर्यादित न राहता, निलंग्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरवणारी ठरत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी ८७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून भाजप, काँग्रेस, उभाठा शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप व काँग्रेसने सर्वच प्रभागांत उमेदवार उभे केले असले, तरी निवडणुकीची खरी लढत तिरंगी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेका मतासाठी सुरू असलेली चुरस मतदान केंद्रांवर ठळकपणे दिसून आली. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सर्वच पक्षांनी वाहनांची सोय केली, तर अनेक ठिकाणी सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.
प्रभाग क्रमांक १, ३, ५, ६ ,१० आणि ११ प्रभागात विशेष चुरस अनुभवास आली.
एकूण ३२ हजार १८२ मतदारसंख्या असलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरगावी कामानिमित्त असलेले मतदार खास मतदानासाठी निलंग्यात दाखल झाले असून, हा मतदारवर्ग निकालाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे काँग्रेस गोटात उत्साह संचारलेला दिसून येतो. दरम्यान, लिंबन महाराज रेशमे यांच्या प्रभावी जनसंपर्कामुळे सत्ताधाऱ्यांसमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे.
मतदारांचा निर्णायक कौल रविवारी दि. 21 रोजी होणाऱ्या मतमोजणीत स्पष्ट होणार असून, निलंग्याचा हा निकाल लातूर महानगरपालिका तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही परिणाम करणारा ठरणार आहे.
दरम्यान ही निवडणूक काही किरकोळ बाचाबाची वगळता कोणत्याही बूथवर गुन्हा नोंद होण्याइतपत गंभीर घटना घडल्याची नोंद निलंगा पोलिस ठाण्यात झाली नसल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली..