निलंगा,दि.२९
निटूर (ता. निलंगा) येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) धनंजय सिताराम कुंभार यांचे काल रात्री झालेल्या अपघातात निधन झाल्याची दुःखद घटना घडली. निवडणुकीचे कर्तव्य पूर्ण करून परत जात असताना लोदगा गावाजवळ रात्री ०९ वाजता त्यांचा अपघात झाला.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालय, लातूर येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच रात्री ०१ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून धनंजय कुंभार यांची ओळख होती. त्यांच्या अचानक निधनाने महसूल विभागासह निलंगा परिसरातही शोककळा पसरली आहे.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ०१ वाजता त्यांच्या मूळ गावी सांजा सारोळा (ता. उस्मानाबाद) येथे होणार आहे. हे गाव औसा उस्मानाबाद मार्गावर शिवली रस्त्यावर स्थित आहे.
परिसरातील सर्व नागरिक, सहकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबास धैर्य लाभो, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.