निलंगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गोंधळ!
पक्षांचे मौन कायम कार्यकर्ते संभ्रमात, इच्छुक उमेदवार ताणावात !
निलंगा(वा)
निलंगा नगरपरिषद निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे, मात्र राजकीय पक्ष अजूनही उमेदवार जाहीर करण्याबाबत मौन बाळगून आहेत. त्यामुळे शहरात राजकीय अनिश्चिततेचे सावट पसरले असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
काँग्रेस, भाजप, शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), आणि वंचित बहुजन आघाडी या सर्व प्रमुख पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अंतर्गत हालचाली सुरू केल्या आहेत.
परंतु कोणालाही अद्याप अधिकृत उमेदवारीचा हिरवा कंदील मिळालेला नाही. प्रत्येक पक्षाच्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये “कोणाला तिकीट मिळणार?” या चर्चांनी रंग घेतला आहे.
एका वरिष्ठ कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “पक्षांतर्गत मतभेद आणि गटबाजीमुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे. सर्वच गट आपापले वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत.”
शेकाप ठाम घराणेशाहीविरुद्ध सूर
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. भाई सुशील सोमवंशी यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शेकाप निलंगा नगरपरिषदेची निवडणूक स्वबळावर लढवेल. जनता घराणेशाही आणि राजकीय सत्तेच्या गैरवापराला कंटाळली आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे निलंगा नगरीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शेकाप नव्या आणि तरुण उमेदवारांना संधी देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा भडका
काँग्रेस पक्षात मागील निवडणुकीपासूनच गटबाजी सुरू आहे. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि काही युवा नेते स्वतंत्रपणे आपापले गट मजबूत करण्याच्या हालचाली करत आहेत.
सध्याच्या घडीला काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे एकजूट राखणे. स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो.
भाजप शांत पण आतून सक्रिय
भाजपकडून जरी बाहेरून कोणतीही घोषणा झालेली नसली, तरी अंतर्गत बैठका आणि रणनीती ठरविण्याचे सत्र जोमात सुरू आहे.
पक्षाचे युवा कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाले असून, “विकासासाठी ठोस पर्याय” म्हणून भाजप स्वतःला सादर करण्याच्या तयारीत आहे.
वंचित बहुजन आघाडी शहरातील प्रभागात आपली पायाभरणी करण्याच्या तयारीत आहे. “जनतेला पर्याय हवा आहे” या भूमिकेतून वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरपरिषदेवर विकासकामांचा ठोस ठसा उमटला नाही, अशी जनतेत नाराजी आहे.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. रस्ते आणि स्वच्छता या तिन्ही आघाड्यांवर नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत “काम करणारा उमेदवार” हीच जनतेची प्राथमिक अट ठरणार आहे.
निलंगा नगरपरिषद निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीची होणार आहे. अनुभवी नेत्यांसोबतच काही नवीन आणि तरुण चेहरेही मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, वंचित बहुजन आघाडी शेकाप मुळे यावेळी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस, भाजप, शेकाप, वंचित यांच्यासोबत अपक्ष उमेदवारांचाही मोठा प्रभाव जाणवू शकतो.
युवा मतदारांचा या वेळी निर्णायक सहभाग असणार आहे. ते पारदर्शक प्रशासन, उत्तरदायित्व आणि प्रामाणिक नेतृत्वाची मागणी करत आहेत.
घराणेशाही, मतलबी राजकारण आणि निष्क्रियतेबद्दलची नाराजी लोकांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे “जो काम करेल, त्यालाच साथ मिळेल” असा स्पष्ट संदेश मतदार देताना दिसत आहेत.
निलंगा नगरपरिषदेची निवडणूक केवळ सत्तासंघर्ष न राहता, ती जनतेच्या विश्वास, विकास आणि नव्या नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल ठरवणारी ठरेल. पक्षांनी मौन सोडून उमेदवारी निश्चित केली, की शहरातील राजकीय तापमान झपाट्याने वाढणार, यात शंका नाही.
मिलिंद कांबळे, निलंगा
मो. 9960049411