लातूर, दि. 06(मिलिंद कांबळे)
बौद्ध जगतात वैशाख पौर्णिमेला जितके महत्त्व आहे, तितकेच महत्त्व कार्तिकी पौर्णिमेलाही आहे. या दिवशी जगभर तथागत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार सुरू झाला. त्यामुळे हा दिवस ऐतिहासिक संघदिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन धम्मचारी प्रज्ञाजित यांनी केले.
शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात बुधवारी आयोजित ऐतिहासिक संघदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध यांची उपस्थिती होती.
धम्मचारी प्रज्ञाजित म्हणाले की, तथागत भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर पंचवर्गीय भिक्षूंना धम्म दिला आणि त्यांच्या दीक्षेनंतर संघाची निर्मिती झाली. “चरीत भिख्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय” असा संदेश देत त्यांनी भिक्षूंना लोककल्याणासाठी भ्रमण करण्याचे आवाहन केले. याच संदेशातून बुद्धधम्म जगभर पोहोचला, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला शरण जाऊन त्यांच्या शिकवणीचा अवलंब केला आणि समाजासाठी आदर्श धम्मसेवक कसा असावा हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. प्रत्येकाने त्यांच्याप्रमाणेच स्वतः धम्माचे आचरण करावे आणि इतरांनाही धम्म सांगावा.
१९५० साली महाबोधी पत्रिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “नवा धम्मसेवक कसा असावा” याचे विवेचन केले आहे. त्यांनी सांगितले की, धम्मसेवकाने बुद्धधम्माचा प्रचार करावा, लोकांचे दुःख नाहीसे करावे, जागतिक संघाची निर्मिती करावी आणि स्वतंत्र बौद्ध धर्मग्रंथ असावा. बाबासाहेबांनी जसे जीवन बुद्धधम्म प्रचारासाठी समर्पित केले तसेच प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.
“प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने धम्मप्रसाराचे व्रत घ्यावे,” असा आवाहनात्मक संदेश प्रज्ञाजित यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मचारी धम्मभूषण यांनी केले, तर आभार धम्मचारी विबोध यांनी मानले.
या प्रसंगी जी.एल. कांबळे, तानाजी कांबळे, चंद्रकांत कांबळे, राजेंद्र सुरवसे, उत्तम गायकवाड, संतोष दलाल, वगरसेन कांबळे, मंदाताई टिळे, संघप्रिया कांबळे आदी धम्ममित्र उपस्थित होते.