मुर्गीनाल्यात मध्यरात्री रक्तरंजित खेळ
लोकशाही धोक्यात?
पोलिसांच्या भूमिकेवर संशय
सोलापूर(प्रतिनिधी)
सोलापूर शहर लष्कर भागातील मुर्गीनाला परिसरात शनिवारी मध्यरात्री राजकारणात सक्रिय असलेल्या किन्नर नेत्याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आयुब सय्यद (वय ५०) या तृतीयपंथी व्यक्तीचा त्यांच्या राहत्या घरात थंड डोक्याने गुदमरवून खून करण्यात आला, आणि खून करून मारेकरी बेधडकपणे फरार झाले.
आयुब सय्यद हे एमआयएम पक्षाकडून प्रभाग क्रमांक १६ मधील इच्छुक नगरसेवक उमेदवार होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय तयारी सुरू केली होती. परिसरात बॅनर, संपर्क आणि हालचाली सुरू असतानाच त्यांचा खून होणे ही साधी गुन्हेगारी घटना नसून लोकशाहीवरच हल्ला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
उशीने तोंड दाबून हत्या – घरात मृतदेह आढळला
घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घराचे दार उघडताच आयुब सय्यद हे बेडवर निपचित अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडावर उशी ठेवलेली होती, त्यामुळे उशीच्या सहाय्याने गुदमरवून हत्या करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. ही हत्या अचानक नव्हे तर सुनियोजित असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सीसीटीव्हीत तिघे मारेकरी?
घराशेजारील सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री दोन ते तीनच्या सुमारास तिघे अज्ञात इसम घरातून बाहेर पडताना स्पष्ट दिसत आहेत. त्यांच्या हातात बॅग, डोक्यावर टोपी आणि पायात पांढरे बूट असल्याचे फुटेजमध्ये दिसते. हत्या करून मोकाट निघून जाणे हे पोलिसी धाक पूर्णतः अपयशी ठरत असल्याचे गंभीर लक्षण मानले जात आहे.
आयुब सय्यद यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोनं व रोख रक्कम असल्याने लुटीच्या उद्देशाने खून झाल्याची चर्चा आहे. मात्र, ते निवडणुकीच्या मैदानात उतरू पाहणारे किन्नर नेतृत्व होते, त्यामुळे हा खून राजकीय द्वेषातून किंवा दबाव टाकण्यासाठी केला गेला का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
हा खून केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण किन्नर समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, राजकारणात सक्रिय असलेल्या किन्नर व्यक्तीचा खून होतो आणि मारेकरी फरार राहतात, हे कायदा-सुव्यवस्थेच्या तोंडावरचे अपयश असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. परिसरातील नागरिकांनी आयुब सय्यद यांचा स्वभाव मनमिळावू, शांत आणि मदतीचा असल्याचे सांगितले.
दरम्यान, हा खून कोणी, का आणि कोणाच्या संरक्षणाखाली केला?
राजकीय इच्छुक उमेदवार असुरक्षित असतील, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था?
असे जळजळीत प्रश्न सोलापूरच्या जनतेतून उपस्थित होत असून, पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक न केल्यास जनआक्रोश उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.