डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीस्तंभ उभारणीसाठी दिलं आयुष्यभराचं योगदान
लातूर (प्रतिनिधी):
राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त, पोलीस खात्यातील माजी कर्मचारी सुरेश यशवंत सोनवणे (वय —) यांचे रविवारी, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
सायंकाळी मारवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
“क्रांतीस्तंभ उभारणीचा त्यांचा लढा समाजासाठी प्रेरणादायी” — भंते पय्यानंद
अंत्यविधीनंतर अनेक मान्यवरांनी सुरेश सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भंते पय्यानंद म्हणाले, “सुरेश सोनवणे काका यांनी आपल्या कसबे तडवळा या जन्मगावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४१ च्या ऐतिहासिक महार-मांग परिषदेला उजाळा देण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रांतीस्तंभ उभारणीसाठी’ दान केली होती.
त्या स्तंभाच्या उभारणीसाठी त्यांनी शासन, प्रशासन व न्यायालयीन पातळीवर अविरत संघर्ष केला. ही त्यांची अपूर्ण लढाई पूर्ण करणे हीच त्यांच्या प्रति खरी आदरांजली ठरेल,” असे ते म्हणाले.
पोलीस खात्याच्यावतीने आदरांजली
गांधी चौक पोलीस ठाण्याचे एपीआय आर.आर. करे यांनी पोलीस खात्याच्यावतीने पुष्पहार अर्पण करून दिवंगत सोनवणे यांना आदरांजली वाहिली.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मोहन माने, रिपाइंचे मराठवाडा सचिव अशोकराव कांबळे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, एस.एम. गायकवाड, प्राचार्य सुहास सरवदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स लिगचे ऍड. शिवकुमार बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच चंद्रकांत चिकटे, बाबुराव धुळे, प्रा. डॉ. यु.टी. गायकवाड, ऍड. ठाकूरमामा, मिलींद कांबळे, तानाजी सोनवणे, भूजंग कांबळे, मच्छिंद्र बलांडे, भगवान वाघमारे, उदय सोनवणे, कॉ. विश्वंभर भोसले, ऍड. सचिन कांबळे, सरपंच विशाल जमाले, सौदागर सवई, दादासाहेब सोनवणे आदींसह विविध स्तरांतील स्नेही, समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या स्मृतीतून…
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना जिवंत ठेवणारा समाजसेवक आज हरपला. पण त्यांच्या क्रांतीस्तंभासाठीचा संघर्ष समाजात सदैव प्रेरणादायी ठरेल.”