– मंजूताई निंबाळकर
निलंग्यात १५ समता सैनिकांना ड्रेस वितरण; सामाजिक परिवर्तनासाठी संघटन बळकटीचा निर्धार
निलंगा, दि. २९
समाजात समता, बंधुता व सामाजिक न्याय केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरवायचा असेल, तर शीलसंपन्न, विचारशील, वैचारिकदृष्ट्या सजग आणि सामाजिक बांधिलकी जपणारी पिढी घडविणे अत्यावश्यक आहे. अन्यायाविरोधात उभे राहणारे, संविधानाचे मूल्य जपणारे आणि परिवर्तनाची मशाल हातात घेणारे समता सैनिकच नव्या समाजनिर्मितीची खरी ताकद आहेत,असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा मंजूताई निंबाळकर यांनी केले.
त्या दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडी, निलंगा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात १५ समता सैनिकांना ड्रेस वितरण प्रसंगी बोलत होत्या.
हा कार्यक्रम केवळ ड्रेस वितरणापुरता मर्यादित न राहता समता सैनिक चळवळीच्या वैचारिक आणि संघटनात्मक बळकटीचा निर्धार व्यक्त करणारा ठरला.
मंजूताई निंबाळकर पुढे म्हणाल्या की,
“आज समाजात वाढत असलेली विषमता, अन्याय, व्यसनाधीनता आणि सामाजिक अधःपतन रोखायचे असेल, तर समता सैनिकांची फळी अधिक मजबूत करावी लागेल. संविधान,बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर आधारित शीलवान माणसे घडविणे ही काळाची गरज आहे. समता सैनिक ही केवळ संघटना नसून ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे.”
यावेळी त्यांनी समता सैनिकांच्या संख्यावाढीसाठी आणि कार्यविस्तारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ठाम हमी दिली.
या कार्यक्रमास डॉ. हिरालाल निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ॲड. बी. आर. धैर्य, एस. के. चेले, भारतीय बौद्ध महासभा तालुका निलंगा संस्कार प्रमुख इंद्रजित कांबळे,
समता सैनिक तालुका उपाध्यक्ष विशाल गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा कासार शिर्शी शाखा अध्यक्ष अंकुश परमेेश्वरे,
सीरसी समता सैनिक प्रमुख सचिन भाले,
यांच्यासह शिलाबाई वामन गायकवाड, रोहिणी विशाल गायकवाड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर समता सैनिक संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक रचना अधिक मजबूत करणे, समाज प्रबोधनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे, संस्कार कार्यशाळा, अभ्यास वर्ग व प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, युवक व युवतींना चळवळीत सक्रिय सहभागी करून घेणे,
गावागावात समता सैनिकांचे कार्य विस्तारण्याचा आराखडा, यावर सखोल चर्चा करण्यात आली. हा उपक्रम समता सैनिक चळवळीला नवी दिशा देणारा असून सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात नवे बळ निर्माण करणारा ठरेल, असा ठाम विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
निलंगा तालुक्यातून उभारी घेत असलेली ही चळवळ लवकरच जिल्हाभरात समतेचा आवाज बुलंद करेल, अशी भावना कार्यक्रमस्थळी व्यक्त करण्यात आली.