महाराष्ट्र अंनिस विवेक जागरदिनी व्याख्या
काँग्रेस प्रवक्ते हनुमंतराव पवार यांचा सवाल !
लातूर,दि.02(मिलिंद कांबळे)
थोर स्वातंत्र्य सेनानी परमपुज्य साने गुरुजी आणि भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर व महाड येथे स्वतंत्रपणे केलेल्या सामाजिक समता- संगराच्या सत्याग्रही लढ्याला, राज्यात कोणी- कोणी विरोध केला ? असा संतप्त वेदनादायी जाहीर सवाल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते श्री हनुमंतराव पवार यांनी केला. १ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र अंनिसच्यावतीने, हॉटेल अंजनी सभागृह लातूर येथे, शहीद डॉ. दाभोलकर यांच्या जन्मदिनी विवेक जागर दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानामध्ये, ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष माधव बावगे हे होत. तर विचारमंचावर समितीच्या राज्य प्रधान सचिव रुक्साना मुल्ला, राज्य सरचिटणीस उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे व शहराध्यक्ष श्री बब्रुवान गोमसाळे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते, विनातेल व विनावात पाण्यावरील, विवेकदिप प्रज्वलीत करून, शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन करण्यात आले. आणि श्री अनिल दरेकर यांनी, ‘डॉ. दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ… ‘ हे गीत गाऊन, सर्व निमंत्रितांचे स्वागत केले. यावेळी, ” शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर : जागर विवेकाचा ” या विषयावर बोलताना, ह.भ.प.श्री हनुमंतराव पवार पुढे म्हणाले की, कोवीडसारख्या जागतिक महामारीमध्ये आपल्या पंतप्रधानांनी आपणास भगुणे, टाळ्या वाजविण्यासह अंधार करण्याचे आवाहन केले. आणि वेदनादायी बाब म्हणजे यात वकील, डॉक्टर, लेखक, इंजिनीअर, प्राध्यापक व थोर कलावंतही सहभागी झाले. एवढेच नव्हे तर यावेळी संसदेसह आध्यात्म क्षेत्रातही, ओंगळवाणी प्रदर्शन करविले गेले. याचा अर्थ संकटसमयी लोकशाहीतील एक जबाबदार शासन संस्थाही, नागरिकांना विवेकी धैर्याचा संयमी विश्वास येथे देऊ शकली नाही. माझी अंनिसशी पूर्व नाळ नसती, तर मी आज नको तेथे राहिलो असतो. अन्य धर्म व त्यांच्या विचारांप्रती विखार ओकून, प्रसिद्धी मिळविणे हे त्यांचे, हेच त्यांच्या प्रगतीचे सूत्र आहे. डॉ. दाभोळकरांसारखा विवेकवादी संवादी या देशात आणखी कोणी निपजला नाही. समतेचा आग्रह धरणारे दाभोलकर करुणाशील होते. समाजात ज्ञान पेरणी करण्यासाठी, ते सतत भ्रमंती करत राहिले. अनिष्ट रुढी, प्रथा व परंपरासोबत त्यांनी सर्व व्यसनाना सुद्धा कठोरपणे विरोध केला. त्या औरंगजेब व इंग्रजापेक्षाही आज समाजाची अधिक आर्थिक लूट ही, व्यसनाच्या व्यापार- माध्यमातून केली जात आहे. लातुर सारख्या शिक्षण पंढरीतही, आज खाजगी शिकवणीच्या बाजारभागामध्ये, नको-नको त्या गंभीर व्यसनाने तरुण मुला-मुलींचे जीवन, म्हणजे भावी राष्ट्र उधवस्त केले जात आहे. येथील धर्मांध व जात्यांध राजकारणाचे व्यसन व हिंसा हे, दोन मुख्य पीलर आहेत. येथे विधिमंडळात सनातनकी जय म्हटले जाते. आणि आमच्या भागवती टाळ- मृंदग वारी- दिंड्यामध्ये, तलवारीवाले घुसविले जातात. तर गुन्हेगारीच्या क्षेत्रातील वर्दिचा वाढता सहभाग हा, रक्षका ऐवजी भक्षकाची खात्री देतोय. हिंसा हाच आरएसएसचा पाया आहे. त्यांच्याच विचार परंपरेने येथे दाभोलकरांची हत्या केली. खाकी चड्डी आणि काळी टोपीच्या, सत्ता व कार्याची सीमा रेषा येथे अधोरेखीत झाली आहे. हे येथील बहुजनाने लक्षात घ्यावयास हवे. त्यामुळे आज दाभोलकरांच्या विवेकी मानवतावादाचा बुलुंद आवाज, आपण एक संघपणे जोराने पोहचवू या ! असे आवाहनही, श्री पवार यांनी केले.
संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ भिसे हो आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हणाले की, आज संघटना राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून तब्बल ३६० शाखामधून विस्तार पावली आहे. निष्ठावान सक्षम कार्यकर्त्यांची फळी,अखंड ग्रंथ निर्मिती व परिश्रमपूवक समूह सातत्य हेच संघटनेची बलस्थान आहेत. या शिवाय स्वतंत्र २ कायद्याची प्राप्तीही खाते दप्तरी जमा आहे. एका बाजूला हा आमचा अभिमानी दाभोलकरी विवेकाचा कारवा, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. तर दुसऱ्या बाजूला येथे, इतिहासाला दुषण देण आणि संविधानाप्रती व्देश- संभ्रम निर्माण करणारी, एक आत्मघातक अशी नवी राजकीय संस्कृती देशात वास करत आहे, असे प्रा. भिसे म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष माधव बावगे हे म्हणाले की, देशाच्या गेल्या ७५ वर्षाच्या सामाजिक, वैचारिक, प्रबोधनात्मक व विवेकवादी वाटचालीत, या संघटनेच्या पाऊल खुणा या अत्यंत ठसठशीत आहेत. निकोप व सक्षक्त समाजभान निर्मिती हे, दाभोलकरांचे अंतिम लक्ष होते. विवेकाच्या अधिष्ठानाने समाज निर्भय व विचारशील बनला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. ख-या प्रश्नांचे सामर्थ्य येथे अंनिसने रुजविले. विषमता व शोषणाच्या विरोधात सामितीने एल्गार पुकारला. सत्ताश्रयाने येथे अध्यात्मिक बुवाबाजी पुन्हा आपले हात- पसरत आहे. या आव्हानाविरुद्ध आपण सर्वांनी पाय रोवून, खंबीर पणे उभे राहू या, अशी सादही माधव बावगे यांनी घातली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती ढगे यांनी केले. तर आभार डॉ. गणेश गोमारे यांनी मानले. ” हम होंगे कामयाब एक दिन…” या समूह गायनाने, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शिवाजीराव शिंदे, ऍड. मोईजभाई शेख, प्रा. डॉ. सुशीलाताई पिंपळे- नारनवरे, प्रा. अर्जून जाधव, प्रा. डॉ. संजय मोरे, पांडुरंग देडे, रामचंद्र तांदळे, श्रावणकुमार चिद्रे, प्रतापराव माने पाटील, अजय निंबाळकर, सुपर्ण जगताप, गणपतराव तेलंगे, सुधीर भोसले, प्रा. डॉ. अनिल जायभाये, रणजित आचार्य, डॉ. बी आर पाटील, संजय व्यवहारे, राहुल लोंढे, ऍड. शरद देशमुख, प्रा. सुभाष भिंगे, प्रा. उत्तम जाधव, मगलताई बावगे, कॉ. धनंजय कुलकर्णी, शकुंतला ढगे, डॉ. रब्बानी शेख, प्राचार्य डॉ. माधव गादेकर, गंगाधर गवळी, सचिन औरंगे आदी बहुसंख्येने हजर होते.