माहिती अधिकारालाही दाद नाही; चौकशी न झाल्यास ठिय्या आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा..
निलंगा,दि.०७
मौजे सांगवी (जे)ता. निलंगा जिल्हा लातूर येथील ग्रामपंचायतीत विकासकामांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले असताना प्रत्यक्षात अनेक कामांचा गावात मागमूसही नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ दत्तू घाडगे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादर केले आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सन २०१४ पासून ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांबाबत माहिती अधिकाराखाली वारंवार माहिती मागविण्यात आली. मात्र आजपर्यंत खर्चाचे तपशील देण्यास ग्रामपंचायतीने टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संशय अधिकच गडद झाला असून माहिती अधिकारालाही दाद न देणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
तक्रारदार दत्तू घाडगे यांच्या आरोपांनुसार, गावांतर्गत पाईपलाईन, सेफ्टी कट्टा, रस्ते दुरुस्ती, स्ट्रीट लाईट, वॉटर फिल्टर खरेदी, सिंगल फेज मोटर, गटार बांधकाम, सिमेंट बाकडे, शौचालय उभारणी, अंगणवाडी दुरुस्ती तसेच दलित वस्ती सुधार योजना अशा अनेक कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या कामांचा गावात ठोस पुरावा दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कागदोपत्री विकास आणि प्रत्यक्षात शून्य काम अशी परिस्थिती असल्याची चर्चा गावात रंगली आहे.
याशिवाय जिल्हा परिषद शाळेसाठी विविध योजनांतर्गत खर्च दाखविण्यात आला असला तरी प्रत्यक्षात कोणतेही काम झाल्याचे दिसत नसल्याचा आरोप आहे. हातपंप नसताना हातपंपासाठी खर्च, फर्निचर नसताना फर्निचरची बिले, पाणीपुरवठा दुरुस्तीचे दाखले मात्र गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी नसल्याची परिस्थिती अशा गंभीर विसंगती असल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या संदर्भात तक्रारदार ग्रामस्थ दत्तू घाडगे यांनी वारंवार जिल्हा परिषद लातूर तसेच पंचायत समिती निलंगाचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून संपूर्ण माहिती जनतेसमोर जाहीर करण्यात यावी. अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले जाईल आणि आवश्यक असल्यास आमरण उपोषण करण्यात येईल,” असा इशारा दत्तू घाडगे व काही ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित सरपंचांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही पुढे आली आहे. ग्रामविकासासाठी मिळालेल्या निधीचा अपव्यय करून जनतेच्या विश्वासाला तडा दिल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या गंभीर आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.मात्र आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास हा प्रकार ग्रामविकासातील मोठा आर्थिक घोटाळा ठरण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.