भगवान बुद्ध–बाबासाहेबांच्या शिकवणीचे चार पिढ्यांवर उमटलेले संस्कार..
प्रा. रोहित बनसोडे
निलंगा, दि. 16
मानवी जीवनाला आकार देणारे ‘काया, वाचा आणि मन’ हे तीन प्रकारचे शील जपण्याचा उपदेश भगवान बुद्धांनी केला आणि त्याच शिकवणीचे सुसंस्कार आपल्या कृतीतून समर्पितपणे जपणारे दादाराव सूर्यवंशी गुरुजी हे खऱ्या अर्थाने समाजातील समता–शीलाचे जिवंत प्रतीक असल्याचे मत प्रा. रोहित बनसोडे यांनी व्यक्त केले.
गुरुजींच्या स्मरणप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांच्या शिकवणीचे आणि चार पिढ्यांवर पोचलेल्या संस्कारांचे सविस्तर विश्लेषणही त्यांनी यावेळी केले.
तत्पूर्वी त्यांनी सुरुवातीला मानवजन्माच्या मूळ सत्याचा उल्लेख केला“आई -वडिलांकडून आपल्याला शरीर, नाव आणि रूप प्राप्त होते; पण हे जीवन सार्थक करणारा खरा पाया म्हणजे शील–संस्कार,”आहे असे सांगताना त्यांनी मानसीक, वाचिक आणि कायक शील यांचे महत्त्व स्पष्ट केले. मानसिक शील हे मनात येणारे विचार पवित्र ठेवते,वाचिक शील वाणी शुद्ध, संयमी आणि हितकारक ठेवते तर कायक शील कृतीतून माणुसकीची सेवा करते.
भगवान बुद्धांनी दिलेला हा त्रिविध मार्गच व्यक्तीला ‘माणूस’ बनवतो, हे या भाषणातून अधोरेखित झाले.
गुरुजींनी संस्कारांचा पाया रचला. चंद्रकांत सूर्यवंशींच्या वर्तनात जिवंत परंपरा
दादाराव सूर्यवंशी गुरुजींनी आयुष्यभर बुद्ध–धम्माच्या नीतीनुसार जगत समाजात शीलाचे बीज पेरले.
त्यांच्या सहवासातून घडलेले चंद्रकांत सूर्यवंशी हे संयमी वाणी आणि शीलपूर्ण वर्तनाचे जिवंत उदाहरण असल्याचे विशेष पणे नमूद केले.त्यांनी “कधीही कठोर किंवा उद्धट शब्द बोलल्याचे आठवत नाही; त्यांच्या प्रत्येक वाक्यात गुरुजींचे शिकवलेले वाचिक शील जाणवते,” असेही बनसोडे यांनी सांगितले.
त्यांच्यातील संयम, सभ्यता आणि प्रत्येक व्यक्तीशी असलेला आदराचा सूर ही गुरुजींनी दिलेली सर्वात मोठी देणगी असल्याचे मत व्यक्त झाले.
मानसिक शील माणसाला आकर्षित करते याचे उदाहरण ही त्यांनी दिले.“कुणी एखाद्या मुलामुलीसाठी स्थळ सांगायला येतो, तेव्हा त्याने बोलण्यापूर्वी केलेले मनातील विचारच त्याला आपल्यापर्यंत आणतात. त्या विचारांची शीलमयता दिसत नसली तरी तीच व्यक्तीचा दर्जा ठरवते.” विचार चांगले असले तर वाणी आपोआप पवित्र होत जाते आणि वर्तन माणसाला माणसाजवळ आणते, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
कायक शील सेवा हीच खरी साधना भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्यास पाणी देणे, आजारी व्यक्तीला मदत करणे, थंडीने कुडकुडणाऱ्यास कपडा देणे…ही सेवा म्हणजेच कायक शील होय.याउलट, एखादा जखमी आहे आणि त्याला मदतीऐवजी उपहास केला तर ती मानसिक अधोगती ठरते, असेही भाषणात सांगण्यात आले.
बाबासाहेब आंबेडकरांच्या कृतींचा उल्लेख करताना बनसोडे यांनी ठामपणे सांगितले की, धम्म, विचार आणि कर्म या तिन्ही अंगांनी बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना दिशा दिली.
त्यांच्या मार्गाने गेलेल्या कोणाचाही विकास थांबत नाही, हेही यावेळी अधोरेखित झाले.
चार पिढ्यांवर संस्कारांची परंपरा गुरुजींचे जीवनकार्य अमर
या कार्यक्रमात बनसोडे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की,
“बाबासाहेबांकडून गुरुजींपर्यंत, गुरुजींपासून चंद्रकांत सूर्यवंशींपर्यंत आणि त्यांच्याकडून त्यांच्या मुला–मुलीं पर्यंत संस्कारांची परंपरा सलग चार पिढ्यांपर्यंत पोहोचली आहे.” ही परंपरा पैशात मोजता येत नाही; हीच खऱ्या अर्थाने बुद्ध–धम्माची जपलेली दीपशिखा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की,“ज्या घरात शील आहे, त्या घरात बुद्ध आहे; जिथे बुद्ध आहे तिथे धम्म आहे; आणि जिथे धम्म आहे, तिथे आदर्श मुलं-मुली जन्मतात.”
यावेळी कार्यक्रमाची सांगता करताना नव्या पिढीत असे गुरुजी पुन्हा पुन्हा घडावेत ही इच्छा व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्तिथ सर्वांनी गुरुजींच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता केली.