
दास (भैय्या) साळुंके यांचा इशारा…
लातूर,दि.२२(मिलिंद कांबळे)
निलंगा तालुक्यातील शेतकरी वर्गाला अजूनही शासनाचे अनुदान मिळालेले नसल्याने अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आज “चटणी-भाकरी आंदोलन” करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष दास (भैय्या) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी संघटनेचे कार्यकर्ते, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार निलंगा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली आहेत.
शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या सणातही शेतकरी हातावर हात ठेवून बसला आहे.”
यावेळी दास साळुंके यांनी स्पष्ट इशारा दिला की,
“जर पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही, तर आम्ही निलंगा तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार आहोत. शासनाने शेतकऱ्यांचा संयम तपासू नये.”
संघटनेचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले की, छावा मराठा युवा संघटन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि अन्याय सहन केला जाणार नाही.
चटणी-भाकरी आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांनी शासनाच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले असून, जर शासनाने तत्काळ कारवाई केली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निलंगा परिसरात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.