महाभूमी डिजिटल सातबारा बंद
निलंगा, (वा)
राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत असलेल्या महाभूमी पोर्टलवरील डिजिटल सातबारा सेवा गेल्या काही दिवसांपासून ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू असून, ती करण्यासाठी सातबारा उतारा आवश्यक आहे. मात्र महाभूमी साईट बंद असल्याने ही नोंदणी पूर्णतः ठप्प झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
डिजिटल सातबारा हा जमीनधारक शेतकऱ्यांच्या मालकीचा पुरावा असल्याने त्याशिवाय कोणताही कृषी व्यवहार, कर्जप्रकरण, अनुदान, विमा, किंवा खरेदी-विक्रीचा दस्तऐवज सादर करता येत नाही. पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज मंजुरी मिळण्यात विलंब होत आहे. अनेक ठिकाणी सहकारी बँकांनी सातबारा उतारा नसल्याने अर्ज स्वीकारलेच नाहीत.
सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारच्या मार्केट यार्डांमध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत सातबारा अपलोड करणे बंधनकारक आहे. पण साईट बंद असल्याने हजारो शेतकरी नोंदणी करू शकत नाहीत. “नोंदणीची अंतिम तारीख जवळ आली आहे, पण वेबसाइटच चालत नाही, अशा परिस्थितीत आमचं मोठं नुकसान होणार,” अशी खंत निलंगा, औसा आणि रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “महाभूमी पोर्टलवर तांत्रिक सुधारणा आणि डेटाबेस अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांत सेवा पूर्ववत होईल.” मात्र नेहमीप्रमाणे ठोस मुदत न दिल्याने शेतकरी अधिकच चिंतेत आहेत.
दरम्यान, शेतकरी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तातडीने पोर्टल सुरू करून सोयाबीन नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी केली आहे.
