निलंगा,दि.०९
मौजे तगरखेडा ता. निलंगा जिल्हा लातूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणा लोकसेवा प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर व तगरखेडा नगरीच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२६ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मिरवणूक काढून तसेच पुरस्कारार्थींवर पुष्पवृष्टी करत कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप देण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संग्राम साने यांनी केले. “स्त्री समृद्ध व्हावी हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असून दरवर्षी लोकसहभागातून हा उपक्रम राबवला जातो,” असे त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक ॲड. वैशालीताई डोळस (छत्रपती संभाजीनगर) यांनी बोलताना सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांनी समाजजागृती केली. स्त्रीला हक्क, अधिकार व संधी मिळाल्यास ती समाजाला अधिक सक्षम बनवू शकते.
प्रमुख अतिथी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे यांनी “स्त्री-पुरुष समानतेच्या मार्गावरूनच समाज व राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य घडू शकते,” असे मत व्यक्त केले. प्रा. दिलीप महालिंगे यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी स्त्रीला समान हक्क मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, प्रशासन, कृषी, न्यायिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या १५ मान्यवरांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२६ देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप फेटा, शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह व सावित्रीबाई फुले यांचे ग्रंथ असे होते.
पुरस्कारार्थींमध्ये ॲड. वैशाली डोळस, सय्यद रहमान, ॲड. श्रीधर गायकवाड, प्रा. डॉ. पल्लवी पाटील, रुकसाना मुल्ला, डॉ. ज्ञानेश्वर सुरवसे, शिक्षिका रसिका गवळी, समाधानताई माने, यास्मिनबेगम मुल्ला, परिमिता जोगदंड, वर्षाताई पाटील, आकाश म्हेत्रे, गिरीश मुळे, बालाजी थेटे व पंडित शिरोळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात संगमनाथ उडबळे यांनी“जिजाऊ-सावित्री यांच्या विचारातून सशक्त समाज निर्माण होऊ शकतो. महिलांना घरापासूनच स्वातंत्र्य देण्याची सुरुवात झाली तरच महिला दिनाला खरा अर्थ प्राप्त होईल,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश हानेगावे व प्रा. डॉ. शंकर कल्याणे यांनी केले तर दत्ता लंगडे यांनी आभार मानले. शेकडो महिला-पुरुषांच्या उपस्थितीत मिरवणूक व पुष्पवृष्टीसह हा सोहळा उत्साहात पार पडला.