डॉ. हिरालाल निंबाळकर
निलंगा,दि.01
“आज गोरक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दिखावा आणि राजकारण सुरू आहे. काही जणांना केवळ प्रसिद्धी मिळवायची असते,तर काहीजण गोरक्षकांच्या नावाखाली दरोडे टाकत आहे. पण हेच लोक रस्त्यावर भटकणाऱ्या, जखमी व आजारी जनावरांकडे डोळेझाक करतात. अशा तथाकथित गोरक्षकांनी आधी त्या जनावरांवर उपचार करावेत, मग गोरक्षणाची भाषा करावी,”कारण काही दिवसापूर्वी निलंगा येथे तथाकथित गोरक्षकांनी एका असा टोला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. हिरालाल निंबाळकर यांनी लगावला आहे.
डॉ. निंबाळकर हे पासुवैद्यकीत अधिकारी होते. त्यांनी अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात जनावरांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. निलंगा तालुक्यातील विविध गावांमध्ये ते नियमित वैद्यकीय सेवा देतात. या पार्श्वभूमीवर त्यांनी समाजातील तथाकथित गोरक्षण संस्कृतीवर थेट भाष्य केले.
ते पुढे म्हणाले, “रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या गाई, वासरे, बैल यांची कोणी विचारपूस करत नाही. काही लोक गोरक्षणाच्या नावाखाली केवळ फोटोसेशन करतात, पण प्रत्यक्षात जनावरांच्या उपचारासाठी, औषधासाठी किंवा चाऱ्यासाठी पुढे येत नाहीत. अशा लोकांना गोरक्षक म्हणणे ही जनावरांची आणि समाजाची दोन्हीचीच थट्टा आहे.”
त्यांनी सरकारकडेही मागणी केली की, “शासनाने गोरक्षणासाठी निधी देताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना आणि पशुवैद्यकांना प्राधान्य द्यावे. अनेक वेळा गोरक्षणाच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. हा प्रकार तातडीने थांबवावा.”
डॉ. निंबाळकर यांनी सामाजिक जबाबदारीबाबत सांगितले की, “खरे गोरक्षक तेच, जे जनावरांच्या वेदना समजून घेतात. ज्या गावात रस्त्यावर एकही जनावर उपाशी राहत नाही, तिथेच खरी गोरक्षणाची संस्कृती आहे. फक्त घोषणांवर आणि राजकीय भाषणांवर गोरक्षण होत नाही; तर ती संवेदनशीलतेतून होते.”
ते म्हणाले की, “गोरक्षण हा धर्म, जात किंवा राजकारणाचा विषय नाही; तो मानवी कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने जनावरांकडे दया, माया आणि सहानुभूतीने पाहिले पाहिजे. समाजाच्या संवेदनशीलतेची खरी परीक्षा हीच आहे.”
शेवटी त्यांनी असे आवाहन केले की, “समाजाने आजारी, जखमी जनावरांवर प्रेमाने उपचार करावेत. खऱ्या अर्थाने गोरक्षण हे शब्दात नव्हे तर कृतीतून दिसले पाहिजे. आजच्या परिस्थितीत गोरक्षणाचा दिखावा थांबवून संवेदनशीलतेचा मार्ग स्वीकारणे अत्यावश्यक आहे.”