लातूर, दि. २६
डिजिटल युगात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्याचा गैरवापर समाजासाठी घातक ठरत असून, समाज माध्यमांचा उपयोग केवळ समाजहित, जनजागृती आणि सकारात्मक परिवर्तनासाठीच व्हावा, असा संदेश महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या समाजकार्य विभागाचे प्राध्यापक प्रो. डॉ. संजय गवई यांनी दिला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि जयक्रांती कला वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबिरात “समाज माध्यमांचा सकारात्मक वापर” या विषयावर ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रो. (डॉ.) राजाभाऊ पवार होते. विचारमंचावर प्रो. (डॉ.) प्रमोद चव्हाण, डॉ. अरुण साळुंखे आणि डॉ. समीना शेख उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गवई पुढे म्हणाले की, आज प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया ही तीन प्रमुख माध्यमे समाजमन घडवण्याची ताकद ठेवतात. मात्र, खोटी माहिती, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टमुळे समाजात तणाव निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सोशल मीडियाचा वापर करताना सत्यता, जबाबदारी आणि नैतिकता पाळणे अत्यावश्यक आहे.
ते पुढे म्हणाले की, योग्य वापर केल्यास सोशल मीडिया शिक्षण, व्यवसाय, संवाद आणि समाजजागृतीसाठी प्रभावी साधन ठरू शकते. आजच्या तरुणांसाठी डिजिटल कंटेंट निर्मितीमधून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत, परंतु त्यासाठी शिस्त आणि मूल्यांची जाणीव आवश्यक आहे.
अध्यक्षीय भाषणात प्रो. (डॉ.) राजाभाऊ पवार यांनी समाज माध्यमे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित करत, त्याचा वापर समाजहितासाठी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. समीना शेख यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी नरेश चामले यांनी केले, तर आभार डॉ. अरुण साळुंखे यांनी मानले.
या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.