जि.प. प्रशाला अंबुलगा (बु.) येथे आदर्श युवा ग्रामसभेतून लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव…
निलंगा,दि.०१
जि.प.प्रशाला अंबुलगा (बु.), ता. निलंगा येथे आदर्श युवा ग्रामसभा (MYGM) या उपक्रमाअंतर्गत लोकशाही मूल्यांची प्रभावी रुजवण करण्यात आली. या उपक्रमात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभाग घेत सरपंच व उपसरपंचाची निवड करून लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मिरगाळे एस. टी. यांनी निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. तर मतदान अधिकारी म्हणून इयत्ता १० वी मधील आलिया, श्रेया व समृद्धी या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पूर्ण केली.
मतदानानंतर तात्काळ मतमोजणी करून सुशांत बलसुरे (इ. १० वी) याची सरपंचपदी, तर श्रुती खारटे (इ. १० वी) हिची उपसरपंचपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदानंद बिरादार व उपाध्यक्ष यशोधन कांबळे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
ही संपूर्ण मतदान व मतमोजणी प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी गणेश तुबाकले, नंदकुमार कुलकर्णी, शामसुरेश गिरी, शोभा मिरगाळे, दत्ता मुळजे, दिलीप पाटील, दिनेश कांबळे, रंजना शानिमे व इंदूताई बिरादार या शिक्षक-शिक्षिकांनी मोलाचे योगदान दिले.
लहान वयातच मतदानाचा अधिकार, लोकशाही मूल्ये व जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, जि.प. प्रशाला अंबुलगा (बु.)ने लोकशाही शिक्षणाचा आदर्श घालून दिला आहे.