…तर हजारो मानकरी पुरस्कार परत करणार
_वैजनाथ वाघमारे
लातूर,दि.११
महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त महासंघाच्या वतीने येत्या शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधानभवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मानधनासह विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याच्या उद्देशाने हा मोर्चा काढण्यात येणार असून, मागण्या न मानल्यास राज्यातील चार हजार पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांकडून आपले पुरस्कार शासनाला परत करण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष वैजनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.यावेळी वैजनाथ वाघमारे यांनी सांगितले की, शासनाकडून मिळणारे १५ ते २० हजार रुपये मानधन अत्यंत अपुरे असून ते तातडीने वाढवावे. तसेच पुरस्कारधारकांना सामाजिक कार्य, साहित्य, कला, समाजसेवा आणि इतर क्षेत्रातील योगदानामुळे हा सन्मान देण्यात येतो. मात्र सध्या पुरस्कार विजेत्यांची परिस्थिती दयनीय असून, शासनाने जाहीर केलेल्या लाभांपैकी अनेक लाभ प्रत्यक्षात प्राप्त होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे मानधनासह सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सवलत मिळावी, मंत्रालयात स्वतंत्र कक्ष, पासेस ची व्यवस्था व्हावी आदी प्रलंबित प्रशासकीय प्रक्रिया तातडीने मार्गी लावाव्यात.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रोहिदास पुरस्कार, दादासाहेब गायकवाड पुरस्कार यांसह विविध विभागांतून राज्यभरातील ३ ते ४ हजार पुरस्कारप्राप्त मानकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास हे सर्व मानकरी आपले पुरस्कार शासनाकडे परत करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा मोर्चा लक्षवेधी ठरणार असून याबाबत शासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी पुरस्कार प्राप्त शामराव सूर्यवंशी,केशव कांबळे होते.