लातूर/प्रतिनिधी
दारिद्र्य, अपयश आणि संघर्ष यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने अखेर जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यशाला गवसणी घालत पोलिस दलात स्थान मिळवले आहे. औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथील सदानंद गोरख नेटके याने आपल्या अथक परिश्रमांच्या जोरावर नांदेड पोलिस भरतीत यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
सदानंदचे बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेले. वडील सुरुवातीला मुंबईत वाळूच्या टिप्परवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते. नंतर शेतीकडे वळत त्यांनी अवघ्या दोन-अडीच एकर जमिनीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. या मर्यादित साधनसंपत्तीमध्येच सदानंदचे शिक्षण व संगोपन झाले.
प्राथमिक शिक्षण तपसे चिंचोली येथे पूर्ण करून त्याने औसा, लातूर आणि धाराशिव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. मात्र शिक्षणासोबतच कुटुंबाची जबाबदारी ओळखून त्याने खाजगी कंपन्यांमध्ये काम केले, शेतीतील मजुरी केली, दूध टेम्पो व ट्रॅक्टर चालवत कुटुंबाला हातभार लावला.

पोलिस होण्याचे स्वप्न डोळ्यांत ठेवून तो झटत राहिला. दोन वेळा पोलिस भरतीत अपयश आले, तर इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) साठी मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे फिजिकल उत्तीर्ण होऊनही तांत्रिक कारणामुळे लेखी परीक्षेत अपयश आले. पण या अपयशांनी त्याची जिद्द मोडली नाही उलट अधिक बळकट केली.
२०२६ मध्ये नांदेड जिल्हा पोलिस भरतीत अखेर त्याने यश मिळवत आपल्या स्वप्नांना आकार दिला.
“परिस्थिती माणसाला लढायला शिकवते आणि कष्टाची भाकर आयुष्याला अर्थ देते,” हे वाक्य सत्यात उतरवत सदानंदने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे.
त्याच्या या यशानंतर १८ मार्च रोजी गावात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्याचा नागरी सत्कार करण्यात आला.
तपसे चिंचोलीच्या मातीतील हा हिरा आज पोलिस वर्दीत चमकला असून, संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे.