नराधम व्यापाऱ्याला कासार शिरशीत बेड्या..
निलंगा,दि.२१(मिलिंद कांबळे )
छत्रपती शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारी एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी घटना लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे घडली आहे. खाऊ घेण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या अवघ्या ६ वर्षे वयाच्या निरागस चिमुरडीवर एका ७० वर्षांच्या नराधम वृद्धाने वासनेची वक्रदृष्टी टाकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. या नराधम व्यापाऱ्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कासार शिरसी येथील ‘राहुल किराणा स्टोअर्स’मध्ये शनिवार, दिनांक २० रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारात एक चिमुरडी खाऊ आणण्यासाठी गेली होती. त्या निरागस बालिकेला काय माहीत की समोर बसलेला ७० वर्षांचा पांढऱ्या केसांचा वृद्ध माणूस नसून एक लांडगा आहे!
व्यापारी नागनाथ लिंबाजी महानुरे (वय ७० वर्ष) याने त्या लहानग्या मुलीच्या अगतिकतेचा आणि निरागसतेचा गैरफायदा घेतला. “तुला खाऊ देतो,” असे आमिष दाखवून त्याने त्या चिमुरडीला जवळ बोलावले आणि तिच्या अंगाला नको तिथे हात लावून अत्यंत असभ्य व अश्लील वर्तन केले. वय वर्षे ७० असलेल्या या वृद्धाच्या या कृत्याने माणुसकीला आणि वयाला लाजवली आहे.
हा प्रकार घडल्यानंतर पीडित चिमुरडी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. घडलेला प्रकार समजताच तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. या माऊलीने तात्काळ हिंमत दाखवत कासार शिरसी पोलीस ठाणे गाठले आणि नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ पावले उचलत आरोपी नागनाथ लिंबाजी महानुरे याच्याविरुद्ध बालिकेच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो – POCSO) गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
या अमानुष आणि संतापजनक घटनेचा अधिक तपास कासार शिरसी पोलीस ठाण्याचे एपीआय प्रताप गर्जे हे स्वतः अत्यंत गांभीर्याने करत आहेत.
अशा घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या आहेत. वय वर्षे ७० असलेल्या या नराधम आरोपीला कायद्याचा कठोर चटका बसलाच पाहिजे, अशी संतप्त भावना सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहे.