निलंगा,दि.१५
भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन निलंगा शहरात शनिवारी उत्साह, देशभक्ती आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच निलंगा शहरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. विविध ठिकाणी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी, देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनाचा उत्साह वाढविला.
यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये जपण्याचा संकल्प करण्यात आला.
निलंगा शहरातील विविध भागांत तिरंगा डौलाने फडकत असल्याने संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले होते. नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून, देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करून संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.