लातूर : मिलिंद कांबळे
लहानपणापासून आपल्यावर होणारे संस्कार हे भाषेच्या माध्यमातून होत असतात. भाषा आपल्या विचारांना मुळाशी घट्ट जोडून ठेवते. हिंदी भाषेमुळे आपण भारताशी, इंग्रजी भाषेमुळे जगाशी, तर मराठी भाषेमुळे मातृसंस्कारांशी जोडले जातो. साहित्य हे समाजाचे दर्पण असले तरी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, असे प्रतिपादन शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. प्रशांत रावसाहेब पाटील यांनी केले.
निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात भाषा संकुलाच्या वतीने आयोजित भाषा वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आजचे युग हे माध्यमांचे युग आहे. युवकांनी, विशेषतः जनरेशन-झेडने आधुनिक माध्यमांचा सकारात्मक व विधायक वापर करावा. या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. भास्कर गायकवाड होते. अध्यक्षीय समारोपात ते म्हणाले की, भाषेचे ज्ञान व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही भाषा कमकुवत नसून प्रत्येक भाषा आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. विविध भाषांमधील दर्जेदार साहित्याचे अनुवाद होऊन ते अन्य भाषांतील वाचकांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. वाङ्मय मंडळाच्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वाङ्मय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल शिंदे यांनी वडिलांच्या मुलाकडून असलेल्या अपेक्षांवर आधारित ‘लढ गड्या’ ही कविता प्रभावीपणे सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख डॉ. अजित मुळजकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मनीषा वारद यांनी केले, तर आभार डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी मानले.
याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. विजय कुलकर्णी, डॉ. सुभाष बेंजलवार, डॉ. हंसराज भोसले, सुनील वाकळे यांच्यासह भाषेवर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
मिलिंद कांबळे,लातूर
मो.9960049411