दौंड,(प्रकाश सोनवणे)
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर.बी. १ नगरमोरी परिसरात ७० वर्षीय सुमन किसन शिंदे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणाचा तपास करताना दौंड पोलिसांनी आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत दोन संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.मात्र, मृत महिलेचे शीर अद्याप सापडलेले नसल्याने ते शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३.१५ वाजता आर.बी. १ नगरमोरी, दौंड येथे सुमन किसन शिंदे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत मयत महिलेची मुलगी तृप्ती सचिन हिरवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६१२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, धारदार हत्याराने महिलेचा गळ्यापासून शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत महिलेचे शीर अन्य ठिकाणी नेण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर दौंड पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान विकी उर्फ विक्रम धनराज अल्हाट, रा. समतानगर, दौंड आणि प्रसाद बाबूलाल चव्हाण, रा. आर.बी. १ नगरमोरी, दौंड यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यानंतर दोघांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
दोन संशयितांना अल्पावधीत अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी मृत महिलेचे शीर अद्याप सापडलेले नाही. त्यामुळे शीर नेमके कुठे नेण्यात आले आणि ते कोणत्या ठिकाणी आहे, याचा शोध घेणे तपासातील महत्त्वाचा भाग ठरला आहे.
आरोपींकडून मिळालेली माहिती, घटनास्थळाची पाहणी, संभाव्य ठिकाणांची झडती तसेच उपलब्ध तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिलेचे शीर सापडल्यास या प्रकरणातील घटनाक्रम आणि उपलब्ध पुराव्यांबाबत तपासाला अधिक दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी व्यापक शोधमोहीम राबवून मृत महिलेचे शीर शोधून काढावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
७० वर्षीय महिलेची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन संशयितांना १२ तासांत अटक करण्यात आली असली तरी मृत महिलेचे शीर अद्याप सापडलेले नसल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शीर कुठे नेण्यात आले, ते शोधण्यासाठी तपास यंत्रणेला कोणती माहिती मिळाली आहे आणि या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम नेमका काय आहे, याची उत्तरे पुढील तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लोकरे करीत आहेत. प्रकरणातील इतर बाबींचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या सूचनेनुसार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बी. बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच संबंधित अधिकारी व अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला.
प्रकाश सोनवणे,दौंड जिल्हा पुणे..