बीड,दि.२७
बीड शहरातील बालेपीर रोड परिसरात पैशांच्या आणि हिशोबाच्या वादातून एका मागासवर्गीय तरुणाची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ज्या दारू दुकानात तो मजुरीचे काम करत होता, त्या दुकानाच्या मालकानेच ही अमानुष मारहाण केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनासह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मयत उमेश नवनाथ दळवी (वय ३५, रा. गोरे वस्ती, बीड) हा सहारा हॉटेलसमोरील लाला शेख यांच्या दारू दुकानात काम करत होता. दुकानाच्या हिशोबात घोळ झाल्याचा संशय घेत आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला हा उमेशकडे सतत पैशांची मागणी करत होता. तसेच “पैसे दे नाहीतर जिवे मारून टाकीन,” अशा धमक्याही देत असल्याची माहिती समोर आली आहे.
यापूर्वीही काम व्यवस्थित करत नसल्याचे कारण सांगत आरोपीने उमेशला मारहाण केली होती. २३ मे रोजी सकाळी कामावर जाताना उमेशने आपल्या पत्नीला मालकाकडून सुरू असलेल्या धमक्यांची माहिती दिली होती. त्यानंतर २४ मे रोजी पहाटेच्या सुमारास बालेपीर नगर रोडवरील महेबुब नर्सरीजवळ आरोपीने उमेशला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी आणि अर्धबेशुद्ध अवस्थेत त्याला रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताची पत्नी संगीता उमेश दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी शेख इरफान शेख समद उर्फ लाला याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे बीड शहरात संतापाची लाट उसळली असून “कामगाराच्या जीवाची किंमत इतकी स्वस्त झाली आहे का?” असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक वेंकटराम हे करत आहेत.