नेवासा,दि.२८
शाळेला सुट्टी लागली म्हणून आनंदाने मामाच्या गावी गेलेल्या दोन निष्पाप भावंडांवर काळाने अशी झडप घातली की, संपूर्ण गाव सुन्न झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे घडलेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा मामा यांचा जागीच मृत्यू झाला. काही तासांपूर्वी हसत-खेळत घराबाहेर पडलेली लेकरं काही क्षणांत काळाच्या पडद्याआड गेल्याने सोनई आणि खरवंडी या दोन्ही गावांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सोनई येथील दत्तनगर भागात राहणारे प्रगतीशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांच्या अभिषेक गणेश दरंदले (वय १६) आणि विजय गणेश दरंदले (वय १४) या दोन्ही मुलांना नुकतीच शाळेची सुट्टी लागली होती. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी दोघेही मोठ्या उत्साहात बुधवार रोजी खरवंडी येथे आपल्या मामाकडे, रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. घरातून निघताना आई-वडिलांनी प्रेमाने निरोप दिला, पण हेच लेकरं पुन्हा कधीच घरी परतणार नाहीत, याची कुणालाही कल्पना नव्हती.
दिवसभर मामाच्या घरी आनंदाचे वातावरण होते. घरात हशा, खेळ आणि गप्पा रंगल्या होत्या. मात्र सायंकाळी काळाने क्रूर रूप धारण केले. खरवंडी परिसरात भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर अचानक अनियंत्रित होऊन पलटी झाला. त्या भीषण अपघातात ट्रॅक्टरवर असलेले अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले.
मोठा आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळी धावले. जीवाच्या आकांताने ग्रामस्थांनी ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढले, पण तोपर्यंत काळाने आपले काम केले होते. गंभीर दुखापत आणि श्वास गुदमरल्याने तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडाला. काही क्षणांत आनंदाचे घर शोकसागरात बुडाले.
या घटनेची माहिती समजताच सोनई आणि खरवंडी गावात आक्रोश उसळला. नेवासा येथे शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्या पार्थिवावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अभिषेक आणि विजय या दोन्ही सख्ख्या भावांवर सोनई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. अंत्ययात्रेदरम्यान गावातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते. आई-वडिलांचा आक्रोश आणि नातेवाईकांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले.
या दुर्घटनेतील सर्वात वेदनादायी बाब म्हणजे गणेश दरंदले यांना केवळ ही दोनच मुले होती आणि काळाने दोन्ही लेकरं एका क्षणात हिरावून नेली. दुसरीकडे रामेश्वर मराठे हे आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यामुळे दोन कुटुंबांचे आधारस्तंभ एका क्षणात कोसळल्याने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
कालपर्यंत घरात घुमणारा लेकरांचा आवाज आज कायमचा शांत झाला आहे. सुट्टीचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेली दोन भावंडं आणि त्यांचा मामा आता फक्त आठवणीत उरले आहेत. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी सुन्न झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.