आंबेडकरी चळवळीचा खंबीर आधारवड हरपला…
ज्येष्ठ आंबेडकरी नेते, माजी नगरसेवक तथा भीमशाहीर मुरलीभाऊ कांबळे यांचे दुःखद निधन..
निलंगा, दि.२८ (मिलिंद कांबळे)
निलंगा शहरातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ, निष्ठावान आणि संघर्षशील कार्यकर्ते, माजी नगरसेवक, भीमशाहीर तथा सामाजिक कार्यकर्ते मुरलीभाऊ कांबळे यांचे आज दि. २८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निलंगा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून आंबेडकरी समाजावर शोककळा पसरली आहे.
मुरलीभाऊ कांबळे हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अखंड निष्ठा ठेवून आयुष्यभर समाजासाठी झटणारे एक जिद्दी योद्धे होते. अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली. गरीब, वंचित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढत राहिले. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे, मनमिळावू स्वभावामुळे आणि समाजाप्रती असलेल्या निस्वार्थ बांधिलकीमुळे ते जनमानसात अत्यंत लोकप्रिय होते.
सन १९९१ च्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मिलिंद नगर–पेठ या प्रभागातून शेतकरी कामगार पक्षाच्या ‘खटारा (गाडी)’ या चिन्हावर निवडणूक लढवून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. आपल्या कार्यकाळात त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत लोकाभिमुख कामे केली.
याच काळात त्यांनी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघाचे निलंगा तालुका अध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम पाहिले. विशेष म्हणजे, गेली तब्बल ३५ वर्षे त्यांनी कोणतेही पक्षांतर न करता बाबासाहेबांच्या विचारांशी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाशी प्रामाणिक राहून कार्य केले. आजही ते वंचित बहुजन आघाडीशी संलग्न राहून सामाजिक आणि वैचारिक चळवळीत सक्रिय होते.
राजकारण आणि सामाजिक कार्यासोबतच मुरलीभाऊ कांबळे हे एक उत्कृष्ट गायक आणि भीमशाहीर म्हणूनही परिचित होते. आपल्या बुलंद आवाजातून त्यांनी जिल्हाभरात आंबेडकरी विचारांची जागृती केली. त्यांच्या गीतांमधून समाजाला प्रेरणा, स्वाभिमान आणि संघर्षाची ऊर्जा मिळत असे. तसेच बौद्ध समाजातील अनेक मंगल परिणय विधी त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने पार पाडले होते. त्यामुळे ते समाजातील प्रत्येक घटकाशी जिव्हाळ्याचे नाते जोडून होते.
त्यांच्या निधनाने केवळ एक माजी नगरसेवक हरपला नसून आंबेडकरी चळवळीचा एक निष्ठावान, प्रामाणिक आणि खंबीर आधारवड काळाच्या पडद्याआड गेला आहे. समाजासाठी अहोरात्र झटणारे, लोकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे आणि बाबासाहेबांच्या विचारांची मशाल अखंड पेटती ठेवणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता मिलिंद नगर, निलंगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली !
— मिलिंद कांबळे, निलंगा,लातूर
मो. ९९६००४९४११