नाशिक,दि.२१
पहिले ‘विश्व धम्मलिपी-लेणी-पालिभाषा साहित्य संगीति-संमेलन’ उत्साहात
तथागत बुद्धांचा विचार, धम्मलिपी, प्राचीन स्तूप, लेणी, गुंफा आणि बुद्धवाणी पालिभाषेचा समृद्ध वारसा जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारावी. या वारशाचा अभ्यास करून त्याचा प्रचार-प्रसार करणे गरजेचे असून, भारतीयांसह जगातील प्रत्येक नागरिकाने या कार्यात योगदान द्यावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या गार्गी निळू फुले यांनी केले.
सर जेम्स प्रिन्सेप यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त ‘धम्मलिपी दिन’ तसेच लोककवी डॉ. वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या शतकोत्तर जयंती वर्षानिमित्त दान पारमिता-लोककवी डॉ. वामनदादा कर्डक प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने पहिले ‘विश्व धम्मलिपी-लेणी-पालिभाषा साहित्य संगीति-संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध बौद्ध साहित्यिक व अभ्यासक मोतीलाल आलमचंद्र होते. प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता व पार्श्वगायक नंदेश उमप, सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल कांबळे, स्वागताध्यक्ष अतुल भोसेकर, प्रवर्तक-निमंत्रक प्रा. शरद शेजवळ आणि संयोजक सुनील खरे उपस्थित होते. चीनचे प्रा. लेले हाँग व श्रीलंकेचे पथुम रणशिंगर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग नोंदविला.
संमेलनात धम्मलिपी, लेणी आणि पालिभाषा, पालिभाषेचे आधुनिक काळातील महत्त्व तसेच प्राचीन बौद्ध सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान या विषयांवर विचारमंथन झाले. यावेळी ‘त्रिरश्मी’ डिजिटल स्मरणिका, चित्रप्रदर्शन, ग्रंथदालन तसेच काव्य-गीत-गझल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा धम्मरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
संमेलनात पालि व बौद्ध धम्म विद्यापीठांची स्थापना करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये पालिभाषेला स्थान देणे, पालिभाषा अभ्यासकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच UPSC व MPSC मध्ये पालिभाषेचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत पालिभाषेचा समावेश करण्याची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली.
प्राचीन लेणींचे संवर्धन करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे, लेणी परिसरात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रथमोपचार व स्ट्रेचरची सुविधा देणे, प्रशिक्षित लेणी मार्गदर्शक नियुक्त करणे तसेच बौद्ध विहारे व लेणी शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे म्हणून विकसित करणे, असे विविध ठराव मांडण्यात आले.
समारोप सत्रात कवी जेस डेझा यांच्या ‘बुद्ध म्हणजे युद्ध नव्हे’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. देश-विदेशातील बौद्ध धम्म अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत, विद्यार्थी आणि संशोधक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संमेलन उत्साहात पार पडले.
सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले, तर आभार व ठरावांचे वाचन संतोष आंभोरे यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. शरद शेजवळ, सुनील खरे यांच्यासह आयोजन समितीतील पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.