निलंगा,दि.१४
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी निलंगा शहरात महसूल व नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी, दि. १४ ऑगस्ट रोजी भव्य ‘हर घर तिरंगा’ तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. हातात तिरंगा घेऊन अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने संपूर्ण शहर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून गेले.
शासनाच्या निर्देशानुसार दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला निलंगा ते लांबोटा वनपरिक्षेत्र परिसरापर्यंत तिरंगा ई-बाईक व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी प्रसाद कुलकर्णी आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. सकाळी १० वाजता निलंगा तहसील कार्यालय परिसरातून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण करीत रॅली लांबोटा येथील वनपरिक्षेत्र परिसरात पोहोचली.

या रॅलीमध्ये गटविकास अधिकारी सतीश पाटील, प्रवीण आळंदकर, कुलदीप देशमुख, अमोल पाटील, अनिल धुमाळ यांच्यासह नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक व महसूल सेवक तसेच नगरपरिषद आणि पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
तिरंगा ध्वजाने सजलेल्या दुचाकी आणि देशभक्तीपर घोषणांमुळे रॅलीच्या मार्गावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
लांबोटा येथील वनपरिक्षेत्र परिसरात रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रभक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रशासनाने या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.
अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तिरंगा बाईक रॅलीला विशेष रंगत आली. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निलंगा शहरात अधिक बळकट झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.