लातूर,दि.१३(मिलिंद कांबळे)
भारतीय बौद्ध महासभा शाखा रेणापूर तालुक्याच्या वतीने सोमवार, दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी सय्यदपूर येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय-धोरणे आणि उद्दिष्टे समाजापर्यंत पोहोचविणे, संघटनेचे कार्य गावागावांत विस्तारण्याबरोबरच पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे, तसेच समता सैनिक दलाच्या कार्याची माहिती देऊन सामाजिक बांधिलकी अधिक बळकट करणे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश होता.
या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे, जिल्हा संघटक प्रा. भाऊराव कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष माया कांबळे, तालुका सचिव सरिता बनसोडे, जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक लक्ष्मण कांबळे, रेणापूर तालुकाध्यक्ष सचिन खंडागळे, यशपाल सूर्यवंशी, पांडुरंग जाधव यांच्यासह रेणापूर तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी प्रा. भाऊराव कांबळे यांनी समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याविषयी माहिती दिली. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक जागृती, समता आणि बंधुतेची मूल्ये रुजविणे, तसेच संघटनात्मक कार्यात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष आशाताई चिकटे यांनी भारतीय बौद्ध महासभेची ध्येय-धोरणे, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तथागत गौतम बुद्धांचा मानवतावादी विचार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायाचा संदेश समाजात पोहोचविण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचे महत्त्व या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
संघटनेच्या शाखांचे कार्य अधिक सक्षम करणे, पदाधिकाऱ्यांमध्ये परस्पर संवाद वाढविणे, धम्मविचारांचा प्रसार करणे आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली. शेवटी जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक लक्ष्मण कांबळे यांनी सरणतय घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला.