निलंगा,दि.१६
धाराशिव येथे दि. १४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथील १४ वर्षांखालील मुलींच्या ४×१०० मीटर रिले संघाने प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. या यशामुळे संघाची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या संघात पायल शिंदे, स्नेहा सूर्यवंशी, जानवी जाधव, प्राची पाटील आणि रीजा सय्यद या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आणि शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात मानाची भर घातली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. पवार, पर्यवेक्षिका देशमुख मॅडम, पर्यवेक्षक बिराजदार सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. क्रीडा मार्गदर्शक सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली मिळविलेल्या या यशाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विभागीय स्पर्धेतील या यशामुळे महाराष्ट्र विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आता राज्यस्तरीय स्पर्धेतही या खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.